स्पाईसजेटचे 12 जानेवारीपासून बुकिंग :
प्रतिनिधी/ बेळगाव
तांत्रिक कारणाने स्पाईसजेट कंपनीने नोव्हेंबर अखेरपासून सकाळची बेंगळूर फेरी बंद केली होती. या विमान फेरीला उत्तम प्रतिसाद मिळत असतानाही ती बंद करण्यात आल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. यासाठी अनेक ग्राहकांनी कंपनीशी संपर्क साधून ही विमानफेरी पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला यश आले असून येत्या 12 जानेवारीपासून ही विमानफेरी पूर्ववत होत आहे. कंपनीने यासाठी बुकिंगही सुरू केल्याचे दिसत आहे.
सकाळी बेळगाववरून बेंगळूरला ये-जा करण्यासाठी स्पाईसजेटचे विमान उपयुक्त ठरत होते. कामानिमित्त बेळगावला येणारे राजकारणी, सरकारी अधिकारी, कंपन्यांचे प्रतिनिधी, व्यावसायिक या विमानाने दाखल होत असत. दिवसभर काम संपवून सायंकाळच्या विमानाने पुन्हा बेंगळूर गाठत असत. त्यामुळे नेहमीच या फेरीला बुकिंग फुल्ल असायचे. परंतु कंपनीला तांत्रिक कारणाने ही फेरी बंद करावी लागली होती. ही फेरी बंद झाल्याने प्रवाशांनी कंपनीला फेरी पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. त्यावेळी लवकरच ही फेरी पूर्ववत होईल, अशी माहिती कंपनीने दिली होती.
सकाळी 8.25 वा. बेंगळूर येथून निघालेले विमान 10 वा. बेळगावला पोहोचणार आहे. तर 1.30 वा. बेळगाववरून निघालेले विमान 11.45 वा. बेंगळूरला पोहोचणार आहे. स्पाईसजेटच्या या फेरीमुळे आता सकाळच्या सत्रात दोन विमाने बेंगळूरला जाण्यासाठी प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. फेरी सुरू करणार असल्यामुळे बेळगावच्या प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत असून स्पाईसजेटने नववर्षाची बेळगावकरांना दिलेली भेट असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
बेंगळूरला आता 4 विमाने उपलब्ध
बेंगळूरला जाण्यायेण्यासाठी आता प्रवाशांना 4 विमाने उपलब्ध झाली आहेत. अलायन्स एअर, इंडिगो व स्टार एअर यापूर्वी बेंगळूर शहराला सेवा देत होते. आता यामध्ये स्पाईसजेटची भर पडली आहे. त्यामुळे दिवसभरात 4 विमाने बेळगावला ये-जा करणार आहेत. यामुळे प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे.