देशात गेल्या 24 तासांत 22 हजार 996 जण ’कोरोना’मुक्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरातील कोरोनाचा विळखा सैल झाला असला तरी साथ अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. दैनंदिन रुग्णसंख्या अद्यापही 20 हजारांच्या आसपास घुटमळत आहे. नवीन आढळणाऱया कोरोना रुग्णसंख्येसह मृत्यूंच्या संख्येतही दररोज भरच पडताना दिसून येत आहे. मात्र, देशात आता केवळ 2 लाख 50 हजार 183 इतके सक्रिय रुग्ण असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
गेल्या 24 तासात देशभरात 19 हजार 79 नवे कोरोनाबाधित आढळले, तर 22 हजार 926 जण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, कोरोनामुळे 224 रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. याचबरोबर देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 3 लाख 5 हजार 788 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 99 लाख 6 हजार 387 जण कोरोनातून बरे झालेले आहेत. याशिवाय, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 1 लाख 49 हजार 218 वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केली आहे.