देशातील एकूण बाधितांचा आकडा 63 लाख 94 हजारांवर : मृतांचा आकडा लाखांसमीप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात सध्या दररोज 80 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत असतानाच भारताला काही प्रमाणात दिलासाही मिळाला आहे. जगातील सर्व देशांमध्ये कोरोनामधून बरे होण्याचा प्रमाणात भारत सध्या आघाडीवर आहे. तसेच देशातील सक्रिया रुग्णसंख्याही वेगाने कमी होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांच्या खाली राहिली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशातील एकूण 53 लाख 52 हजार 78 लोक कोरोना आजारातून बरे झाले आहेत. तसेच सध्या देशात केवळ 9 लाख 42 हजार 217 इतके सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात देशात 78 हजार 877 लोक बरे झाले आहेत. देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 83.70 टक्के आहे तर ऍक्टिव्ह रेट 14.74 टक्के आहे. तसेच भारतातील मृत्यूचे प्रमाण 1.56 टक्के आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या अखेरच्या चोवीस तासात देशात 81 हजार 484 इतके नवीन रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णांचा आकडा 63 लाख 94 हजार 68 वर पोहोचला आहे. तर गेल्या चोवीस तासात 1 हजार 95 जणांचा बळी गेल्याने आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 99 हजार 773 वर पोहोचला आहे.
जगामध्ये कोरोनाचे संकट हे झपाटय़ाने वाढत आहे. भारताला सुद्धा कोरोना संकटाने चांगलेच ग्रासले आहे. भारतात रोज 80 हजारापेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तरीही कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे दिलासा व्यक्त केला जात आहे