चार हजार मुलांचा उचलला खर्च
वृत्तसंस्था/ मुंबई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. सध्याच्या घडीला कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊनमय स्थिती आहे. अशा परिस्थितीत कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत. सचिननेही केंद्र व राज्य सरकारच्या मदतनिधीला 25 लाखांची मदत केली आहे. याशिवाय, मुंबईतील एका सामाजिक संस्थेच्या मदतीने त्याने पाच हजार गरजू लोकांना मदतही केली आहे. आता, यापुढे जात त्याने हाय-फाय या सामाजिक संस्थेच्या मदतीने मुंबई महापालिकेच्या शाळेतील चार हजार मुलांचा खर्च उचलला आहे.
सचिनने या चार हजार मुलांना मदत करण्यासाठी मुंबईतील हाय-फाय या संस्थेची मदत घेतली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सचिन या चार हजार गरजू मुलांपर्यंत आपली मदत पोहोचवणार आहे. या संस्थेने एक ट्विट करत ही माहिती दिली आहे. पालिकेच्या शाळेत शिकणाऱया मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असते, यासाठी सचिन आता या संस्थेच्या मदतीने मुलांना मदत करणार आहे.