वृत्तसंस्था/ लंडन
भारतीय क्रिकेट क्षेत्रात गेल्या दोन दशकामध्ये सचिन तेंडुलकरने आपल्या दर्जेदार कामगिरीने अनेक विक्रम नोंदविले. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातही सचिनने विक्रमी धावा केल्या आहेत. सचिनचे क्रिकेट क्षेत्रातील बरेच विक्रम अबाधित राहिले आहेत पण अलिकडच्या काही कालावधीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने जागतिक क्रिकेट क्षेत्रामध्ये आपले वेगळे स्थान प्रस्थापित केले आहे. सचिनप्रमाणे कोहलीनेही विक्रमांची बरसात सुरू ठेवली आहे. पण सचिनच्या तुलनेत विराट कोहली थोडा अधिक सरस असल्याचे वैयक्तिक मत इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने व्यक्त केले आहे.
विराट कोहलीने आपल्या फलंदाजीमध्ये सातत्य राखताना आपल्या संघाला सलग विजय मिळवून दिले आहेत. कसोटी, वनडे तसेच टी-20 या तिन्ही प्रकारामध्ये विराटची कामगिरी अप्रतिम असल्याचे जाणवते. विराटने फलंदाजीमध्ये किमान 80 धावांची सरासरी राखली आहे. सध्याच्या कालावधीत जागतिक क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्मिथ आणि भारताचा विराट कोहली यांच्यात आघाडीच्या फलंदाजासाठी चुरस सुरू आहे पण प्रत्यक्षात कोहलीच्या जवळपासही स्मिथ पोहचू शकत नाही, असे मत पीटरसनने व्यक्त केले. कोहलीने आपल्या दमदार फलंदाजीचे वारंवार दर्शन घडविताना प्रतिस्पर्धी संघाकडून दिलेले आव्हान यशस्वीपणे पार करत भारताला विजय मिळवून दिला आहे. दडपण असतानाही कोहलीने आपल्या भक्कम फलंदाजीच्या जोरावर संघाला विजयी केल्याचे जाणवते, असेही पीटरसनने म्हटले आहे.
कोहली आणि तेंडुलकर यांच्यातील अधिक सरस खेळाडूची निवड करण्यास झिंबाब्वेचा माजी क्रिकेटपटू बाग्वाने मला सुचविले असे पीटरसनने सांगितले. वनडे क्रिकेटमध्ये चेसिंग करताना कोहलीने आपली अधिक शतके नोंदविली आहेत. कोहलीने आपल्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाच्या कामगिरीला अधिक महत्व दिले आहे. कोहलीने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतके झळकविली असून त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात फलंदाजीत 50 पेक्षा अधिक सरासरी राखली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या स्मिथने मात्र कोहलीपेक्षा कसोटीत अधिक सरस धावसरासरी राखताना 73 कसोटीत 62.74 धावांच्या सरासरीने एकूण 7227 धावा जमविल्या आहेत. कोहलीने 86 कसोटीत 53.62 धावांच्या सरासरीने 7240 धावा जमविल्या आहेत. कोहलीने वनडेत फलंदाजीत 59.33 तर टी-20 मध्ये 50.80 धावांची सरासरी राखली आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्मिथने वनडेत 42.46 तर टी-20 मध्ये 29.60 धावांची सरासरी राखली आहे.