नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महान फलंदाज सचिन तेंडुलकरने कोव्हिड-19 रुग्णांकरिता ऑक्सिजन पुरवठय़ासाठी 1 कोटी रुपयांचे सहाय्यधन जाहीर केले. मिशन ऑक्सिजन या संस्थेकडे सचिन सदर सहाय्यधन सुपूर्द करेल. मिशन ऑक्सिजन ही दिल्ली-एनसीआरस्थित 250 पेक्षा अधिक युवा उद्योजकांची संघटना असून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स परदेशातून आयात करुन ते भारतात आवश्यक असलेल्या इस्पितळांना मोफत प्रदान करते.
48 वर्षीय सचिन कोरोनाची बाधा झाल्याने स्वतः हॉस्पिटलमध्ये काही वेळ राहिला असून त्यावेळी आलेले अनुभव सचिनने यावेळी मांडले. ‘कोरोनाच्या दुसऱया लाटेने आरोग्याची काळजी घेणाऱया सर्व घटकांवर प्रचंड दडपण आले आहे. गंभीर असलेल्या कोरोना रुग्णांना वेळीच ऑक्सिजन मिळणे ही काळाची गरज बनली आहे’, असे सचिन आपल्या ट्वीटर हँडलवर म्हणाला.
स्वतः सचिनने आपण प्लाझ्मा प्रदान करणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले होते. कोरोनाविरुद्धच्या या लढय़ासाठी राजस्थान रॉयल्सने 7.5 कोटी तर दिल्ली कॅपिटल्सने देखील 1.5 कोटी रुपयांचा मदतनिधी जाहीर केला आहे.