ऑनलाईन टीम / मुंबई :
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटके ठेवल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्यप्रकरणी संशयित आरोपी आणि निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाझे यांना आणखी 9 दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
- मला बळीचा बकरा बनवले जात आहेे : सचिन वाझेंचे विधान
दरम्यान, या प्रकरणात मला बळीचा बकरा बनवले जात आहे असे धक्कादायक विधान वाझे यांनी केले आहे. ते म्हणाले, या प्रकरणाशी माझा काहीही देणे घेणे नाही. मी फक्त या प्रकरणाचा तपास करीत होतो. आता पर्यंतच्या तपासात सहाकार्य केल्याचा दावा करत वाझे यांनी पुन्हा एकदा एनआयए कोठडी नको, अशी विनंती देखील केली आहे. मात्र, ही विनंती नाकारत त्यांना 3 एप्रिल पर्यंत एनआयएची कोठडी सुनावली आहे.
सचिन वाझेंना यापूर्वी एनआयएने 14 मार्च रोजी एनआयएच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली होती. आज वाझेंची कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा विशेष न्यायालयात हजर केले.
यावेळी एनआयएने कोर्टामध्ये आज अत्यंत धक्कादायक माहिती दिली. वाझेंना पोलीस अधिकारी म्हणून सरकारी कोट्यातून 30 जिवंत काडतुसे देण्यात आली होती. तसेच त्यांना एक रिव्हॉल्वर देण्यात आली होती. 30 पैकी पाच बुलेट्स वाझेंकडे आहेत. मात्र 25 काडतुसे गायब आहेत. ही 25 काडतुसे कुठे गेली याबाबत वाझे काहीही माहिती देत नसल्याचंही एनआयएने कोर्टाला दिली.