ऑनलाईन टीम / मुंबई :
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके सापडल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना आता पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती.
सचिन वाझे यांच्या बडतर्फीचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेयांनी मंगळवारी काढले. सचिन वाझे यांना 13 मार्च या दिवशी अटक करण्यात आली होती. भारतीय राज्यघटनेच्या कलम 311 (2) (ब) अन्वये सचिन वाझे याच्यावर कारवाई करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर सांगण्यात आले आहे.
सचिन वाझे यांच्यानंतर आता त्यांना मदत करणारे पोलीस अधिकारी रियाझ काझी आणि सुनील माने यांच्यावरही लवकरच बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते आहे. साधारण तीन दशकांपूर्वी म्हणजेच नव्वदच्या दशकात महाराष्ट्र पोलीस दलातील एक जबरदस्त ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’ अशी सचिन वाझे यांची ओळख झाली होती.