प्रतिनिधी / सातारा :
नवीन वर्ष म्हटलं की, बाल गोपालांपासून ते अगदी तरुण, वयोवृध्दांपर्यंत वेगवेगळे पार्टीचे बेत आखले जातात. मात्र, या गोष्टीला बगल देत परळी खोऱ्यातील दुर्ग प्रेमी मावळ्यांनी नवीन वर्षाच्या पहाटेच किल्ले सज्जनगडावर भलामोठा भगवा ध्वज फडकावून दुर्ग सज्जनगड स्वच्छ करण्याचा विडा उचलला.
सज्जनगडावरील समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश बुवा रामदासी यांच्या हस्ते ध्वजाचे पुजन करुन भगवा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी शिवरायांच्या जय घोषांनी सज्जनगड दुमदुमून गेला होता. गेल्या दोन महिन्यापासून किल्ले सज्जनगडावर बुरुज तटबंदीची स्वच्छता तसेच दिवाळीच्या पहिल्या आंघोळीला भल्यापहाटे दिपोत्सव साजरा करण्यात आला. यापुढेही असे उपक्रम राबवत जिल्ह्यातील गडकिल्ल्यांची निगा राखण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.