प्रतिनिधी/ गुहागर
गुहागर तालुक्यातील वेळंब, पांगारी पाठोपाठ सडे-जांभारी येथील 25 वर्षीय प्रसुती झालेल्या महिलेला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. या महिलेवर जिल्हा रूग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करून प्रसुती करण्यात आली होती. या महिलेसह 9 जण मुंबई येथून आल्याचा अहवाल असल्याने या सर्वांचे स्वॅब घेऊन त्यांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे.
गुहागर तालुक्यात सलग दुसऱयादिवशी सडेजांभारी येथील रूग्ण सापडल्याने ग्रामीण भागात मुंबईतून आलेले कोरोना रूग्ण सापडू लागले आहेत. शृंगारतळी येथील चारजणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्या घरातील दोघांचे म्हणजे पॉझिटीव्ह आढळून आलेल्या तीन वर्षाच्या बालकाचे आजोबा व काकीचे अहवालही पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यात बाधितांची संख्या 11वर जाऊन पोहचली आहे. शुक्रवारी आलेल्या स्वॅब अहवालामधून कोरोना पॉझिटीव्ह सापडलेली महिला 17 मे रोजी मुंबईतून सडेजांभारी येथे आली होती. एकूण 10जण मुंबईतून आले. सडेजांभारी-वरचीवाडी येथे त्यांचे स्वतंत्र घर असून ते होम क्वारंटाईन आहेत. 18 मे रोजी या महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तिला गावातीलच वाहनाद्वारे जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्रसुतीवेळी शस्त्रक्रिया करण्याअगोदर सर्व तपासण्या कराव्या लागतात. त्याप्रमाणे कोरोना तपासणीसाठी स्लॅब घेण्यात आले होते.
19 मे रोजी प्रसूती झाल्यावर शुक्रवारी रात्री उशिराने तिचा अहवाला कोरोना पॉझिटीव्ह आला आहे, तिच्याबरोबर सासू, सासरे व पती रत्नागिरीत असल्याने त्याठिकाणीच संपर्कात आलेल्या तिघांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. तर गावी संपर्कात आलेले आणखी सहा सदस्य, तसेच रत्नागिरी येथे वाहनाने घेऊन जाणारा गावातीलच एका चालकाचे स्वॅब घेतले जाणार आहेत. या वाडीमध्ये 59 घरे असून ही वाडीच आयसोलेट करून आरोग्य तपासणी केली जाणार आहे. मुंबईतून आलेले हे कुटुंब कोणाच्याही संपर्कात आलेले नव्हते, असे येथे केलेल्या सर्वेक्षणातून पुढे येत आहे.
डॉक्टरसह कर्मचाऱयांचा अहवाल निगेटीव्ह
शृंगारतळीतील एकाच घरातील चारजणांबरोबर त्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी घेतलेल्या स्वॅबमध्ये घरातील आणखी दोघेजण पॉझिटीव्ह निघाले आहेत. तर या घरातील एक सदस्या शृंगारतळीतील खासगी दवाखान्यात तपासणीसाठी गेल्याने खासगी डॉक्टरसह दोन कर्मचाऱयांचेही स्वॅब घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. स्वॅब घेतलेल्या खासगी डॉक्टरसह दोन कर्मचाऱयांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
जामसूदच्या रूग्णाचा दुसरा अहवाल पॉझिटीव्ह
जामसूदमध्ये मिळून आलेल्या दोन रूग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर त्याच्याबरोबर असलेल्या पालशेत येथील 50वर्षी व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्याला गुहागर एज्युपेशन सोसायटीच्या मुलींच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर बनवून ठेवण्यात आले आहे. या रूग्णाचा 9 दिवसांनी स्वॅब घेण्यात आला होता. या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने या रूग्णावरील उपचार सुरू ठेवावे लागणार आहे.