जवळपास 75 टक्के समभाग प्रभावीत
मुंबई
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई)ने पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या समभागाच्या किमतीमध्ये वेगाने सततची घसरण राहिल्याने त्यावर उत्तर मागितले आहे. बाजारात समभागाचा भाव सतत घसरत असल्याने बीएसईने चिंता व्यक्त केली आहे. आयपीओ प्राईसपेक्षा समभाग 70 टक्क्यांपेक्षा अधिकच्या वेगाने का घसरला आहे, याबाबतचे स्पष्टीकरण बीएसईने मागितले आहे.
पेटीएमचा समभाग मंगळवारच्या सत्रात 22.20 रुपये (3.92टक्के) घसरुन 543.50 वर बंद झाला आहे. समभागाची इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) किमत 2,150 रुपये होती. त्यानंतर तो समभाग घसरणीत राहिला आहे. आयपीओला नोव्हेंबर 2021 रोजी बाजारात सादर केले होते. पाच दिवसांमध्ये पेटीएम 18.22 टक्क्यांनी प्रभावीत झाला आहे. याचा वेग एक महिन्यात पाहिल्यास घसरण 33.88 टक्के राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील सहा महिन्यात पाहता 65.18 टक्के घसरण राहिली आहे. सदरची घसरण ही मोठी मानली जात आहे. 11 मार्च रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेवर निर्बंध लागू केले होते. पेटीएमने चीनमधील काही कंपन्यांसोबत डाटा शेअर केल्याच्या आरोपामुळे आरबीआयने पेटीएम बँकेला नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घातली आहे.