बायो बबल अर्थात सोन्याच्या पिंजऱयात राहणे देखील कसे कष्टप्रद, त्रासदायक ठरु शकते, याचा आता आयपीएल स्पर्धेत सहभागी असलेल्या खेळाडूव्यतिरिक्त अन्य घटकांना अधिक त्रास होत आहे. अगदी खेळाडूंपैकी इयॉन मॉर्गनने देखील अधिक काळ अशा बंधनात राहिल्याने खेळाडूंच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे काही दिवसांपूर्वी म्हटले. या बायो बबलमध्ये राहताना सर्व सदस्यांची 4 दिवसातून एक कोरोना टेस्ट होत असून किंग्स इलेव्हन पंजाबची सहभागीदारी प्रीती झिंटाच्या आतापर्यंत थोडय़ाथोडक्या नव्हे तर 20 कोरोना टेस्ट झाल्या आहेत. प्रीती अन्य सर्वांप्रमाणे या चाचण्यांना सहकार्य करत आहे. अर्थात, तिने 20 व्या चाचणीनंतर एक ट्वीट केले आणि त्यात म्हटले, ‘ही कदाचित माझी 20 वी कोरोना चाचणी. आता मी कोव्हिड टेस्ट क्वीन झाले आहे’!
प्रीतीने ही टिपणी करताना स्वॅब घेत असतानाचे एक छायाचित्रही पोस्ट केले आहे. बायो बबल अर्थात जैवसुरक्षित वातावरणात बाहेरील कोणाला प्रवेश नाही. त्याचप्रमाणे आतील कोणी व्यक्ती देखील बाहेर जाऊ शकत नाही. सर्व खेळाडू, प्रँचायझी, प्रशिक्षक, पथकातील सदस्य या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी ही खबरदारी घेतली जात आहे आणि यामुळे आतापर्यंत सारे काही सुरळीत सुरु आहे. मात्र, प्रत्येक चार दिवसांनी एकदा होणाऱया कोरोना चाचणीमुळे आयपीएल बायो-बबलमधील सारे सदस्य आणि कोरोना किंग किंवा कोरोना क्वीन होण्याच्या मार्गावरच प्रवास करत आहेत!