फिरोजपूर / वृत्तसंस्था
फिरोजपूरमधील सतलज नदीमध्ये सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानी बोट जप्त केली आहे. कारवाईच्या वेळी बोट रिकामी असली तरी सुरक्षा यंत्रणांनी त्याचा अधिक तपास सुरू केला आहे. ही बोट येथे कधी आली, त्यात कोण कोण होते आणि ती येथे आणण्यामागचा हेतू काय होता, याचा शोध तपास यंत्रणांकडून घेतला जात आहे. दोन दिवसांपूर्वी याच भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडकल्याने पाकिस्तानी बोट जप्त करण्याची कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. तपासात सहभागी असलेल्या बीएसएफने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. मात्र, जप्त करण्यात आलेली बोट पाकिस्तानी असल्याचा दावा बीएसएफने केला आहे. तसेच बीएसएफच्या पथकाने आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या बोटीतून आलेले काही लोक भारतीय हद्दीत घुसले नाहीत ना, याचा शोध घेतला जात आहे. तसेच याचा संबंध पाकिस्तानमधून ड्रग्ज आणि शस्त्रे पाठवण्याच्या प्रयत्नाशीही जोडला जात आहे. यापूर्वी 2018 मध्येही अशीच एक बोट सापडली होती.
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारची उच्चस्तरीय समिती फिरोजपूरला पोहोचली असतानाच पाकिस्तानी बोट जप्त करण्यात आली आहे. यामध्ये गृह मंत्रालयाचे सुरक्षा सचिव सुधीर कुमार, आयबीचे सहसंचालक बलबीर सिंग आणि एसपीजीचे आयजी एस. सुरेश यांचा समावेश आहे. बोट सापडलेला भाग पाकिस्तान सीमेला लागून असल्याने फिरोजपूर हा अतिशय संवेदनशील जिल्हा मानला जातो.