गारगोटी / प्रतिनिधी
गोकुळ दुध संघाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक यांनी आज रविवार सकाळी राधानगरी भुदरगड आजरा चे आमदार प्रकाश आबीटकर यांच्या निवासस्थानी भेट दिली मात्र आमदार आबीटकर मुंबईत असल्याने त्यांची भेट होवू शकली नाही.आबीटकर यांचे बंधू प्राचार्य अर्जुन आबीटकर यांचेबरोबर त्यांनी चर्चा केली.यावेळी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार आबीटकर यांचा गोकुळ च्या निवडणुकीतील पाठिंब्यासाठी सत्तारूढ तसेच विरोधी पॅनेलमधून रस्सीखेच सुरू आहे. सातत्याने जिल्ह्याचे नेते आमदार आबीटकर यांचा पाठींबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.आबीटकर यांना राधानगरी व भुदरगडात तालुक्यासाठी दोन जागांची मागणी आहे त्याचबरोबर जिल्हा बॅकेसाठी ही शब्द हवा आहे तशी त्यांनी दोन्ही संस्थेच्या निवडणुकीकरीता तयारी केली आहे .प्राचार्य अर्जुन आबीटकर यांची जिल्ह्य बॅकेसाठी पतसंस्था गटातून तयारी सुरू आहे.मात्र विरोधी पॅनेलमधून गोकुळ साठी एकच जागेचा प्रस्ताव अमान्य झाल्याने त्यांनी आपली भुमिका गुलदस्त्यातच ठेवत मुंबई गाठली.
गेली दोन दिवस आमदार पी एन पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक त्यांच्या भेटीसाठी प्रयत्न शील होते मात्र आमदार आबीटकर मुंबईत तळ ठोकून असल्यामुळे पाठींब्याचा निर्णय होत नाही कुणाला पाठींबा द्यावयाचा याचे मोठे धर्मसंकट त्यांच्यापुढे ठाकले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे सकाळी सात वाजता पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांनी प्राचार्य आबीटकर यांच्या बरोबर चर्चा केली.
सायंकाळी आबीटकर गटाची बैठक होत असून त्यांचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान भोगावती साखर कारखान्याच्या संचालक मंडळानेही आबीटकर यांच्या घरी भेट दिली.