विश्वजित राणे यांची ग्वाही, केरी येथील शंकरनाथ मठाच्या सभागृहाचे उद्घाटन
वार्ताहर /केरी
सत्तरीतील युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आणि सत्तरीच्या विकासासाठी सदैव प्रयत्नरत राहणार असल्याची ग्वाही आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. बाहेरील वाडा केरी सत्तरी येथील श्रीमद सदगुरू शंकरनाथ मठ आश्रमाच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मठाचे मठाधिश चंद्रकांत गावस, होंडा जिल्हा पंचायत सदस्य आणि शंकरनाथ मठ समितीचे अध्यक्ष सगुण वाडकर, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, केरी ग्रामपंचायत सरपंच दाऊद सय्यद, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे उपव्यवस्थापक दीपक नार्वेकर, केरी अर्बन सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पिसुर्लेकर, कंत्राटदार एस. एन. नाईक, स्थानिक पंच सदस्य लक्ष्मण गावस, शंकरनाथ समितीचे उपाध्यक्ष दत्ता शेटकर, सचिव कृष्णा गावस, खजिनदार महादेव गावस आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मठाच्या सुहासिनीतर्फे राणे यांचे दिपोत्सवाने व भक्तीमय दिंडीने स्वागत केले.
मठाच्या भक्तीमय परंपरेचा गौरव केला व आपली या मठासाठी सतत मदत राहणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी दीपक नार्वेकर यांनी श्री शंकरनाथ मठाचे स्थानिक युवकांना अध्यात्मकि, संगीत, कला क्षेत्रात मार्गदर्शन करण्याचे कार्य केले आहे. या मठाचे येथील युवकांना व्यासपीठ प्रधान केले आहे. सगुण वाडकर यांनी मठाच्या कार्याचा आलेख घेतला व दाऊद सय्यद यांनी शुभेच्छा दिल्या. सचिव कृष्णा गावस यांनी मठाचा इतिहास कथित केला. गजानन गावस यांनी आभार मानले.