ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पदभार स्वीकारता यावा, यासाठी सत्तांतर प्रक्रिया सुरू करण्यास डोनाल्ड ट्रम्प यांनी परवानगी दिली आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर मतदान प्रकियेत घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत ट्रम्प यांनी सत्तांतर होऊ देणार नसल्याचा कांगावा केला होता. मात्र, देशहितासाठी आपण सत्ता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली. मला पराभव अमान्य असून, मी माझा लढा सुरूच ठेवणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील प्रशासकीय कामकाजाचे हस्तांतरण मावळत्या राष्ट्राध्यक्षांच्या टीमकडून नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांकडे करण्याची प्रक्रिया जनरल सर्व्हिसेस ॲडमिनिस्ट्रेशन (GSA) करते. त्यांनी सत्तांतर प्रक्रिया सुरू करण्यास सुरुवात केली असून, बायडेन यांना यासंदर्भात कळवण्यात आले आहे.