नगरसेवक राजू बोंद्रे यांचे आंदोलन : प्रभागात लाईटचे काम रखडल्याचा आरोप
प्रतिनिधी/इचलकरंजी
येथील प्रभाग क्रमांक 10 मध्ये लाईटचे खांब व एलईडी बसवण्याचे काम मंजूर होवुन दोन वर्षाचा कालावधी लोटला असून कार्यादेश देवून वर्ष झाले आहे. पण अद्यापीही हे काम सुरु झाले नसल्याच्या निषेधार्थ नगरसेवक राजू बोंद्रे यांनी पालिकेच्या विद्युत विभागाला टाळे ठोकले. यावेळी उपमुख्याधिकारी केतन गुजर व विद्युत विभागाचे जाधव यांच्याशी चर्चा केल्यानंतर आठ दिवसात कामास सुरुवात न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
येथील प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनेक वर्षापासुन लाईटची व्यवस्था नाही. याबाबत मार्च 2020 मध्ये मक्तेदारास संबंधित ठिकाणी 4 लाखाचे बजेट मंजूर करून 30 खांब व एलईडी बसवण्याचा कार्यादेश देण्यात आला आहे. पण अजूनही काम न झाल्याने त्या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तेथील रहिवाशांमध्ये मोकाट कुत्री, साप, विंचू यासारख्या प्राण्यांपासून धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तात्काळ येथे कामास सुरुवात करावी, अन्यथा टाळेठोक आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर बुधवारी नगरसेवक राजू बोंदे यांनी नागरिक व महिलांसह येवून पालिकेतील विद्यूत विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकत घोषणाबाजी केली. यानंतर उपनगराध्यक्ष केतन गुजर यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये नागरिकांनी तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या. यावेळी गुजर यांनी मक्तेदारास मुदतवाढ देवूनही काम पुर्ण करत नाही. तसेच त्याने अन्य कामाच्या बीलाची मागणी केली असुन ती दिल्यासच काम सुरु करणार असल्याचे सांगितले. यावर त्याच्या बिलाबाबत निर्णय घेवून आठ दिवसांत काम सुरु करा, अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलनाचा इशारा नगरसेवक बोंद्रे यांनी दिला.
आंदोलनात भारत पोवार, ईलाही मुजावर, दस्तगीर सनदी, मेहबुब शेख, उस्मान जमादार, सतीश घोरपडे, शाबाज मुक्केरी, राहूल घोरपडे, शंकर मानकर, हारुण मोमीन, अफजल शिरट्टी, राजदीप सनगर, शाहरूख सनदी, अषीश कोरवी, इरफान मकानदार, अरूणा जाधव, कविता पाटील, ज्योती गोडसे, अल्लाबी शेख, शहनाज फकीर, नजमा शेख आदी नागरिक उपस्थित होते.