ख्रिस्ती धर्मियाला उपमुख्यमंत्रीपद
‘आप’ची धूर्त राजकीय खेळी
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची घोषणा
हे जातीचे राजकारण नव्हे, समाजावरील अन्याय दूर करण्याचे प्रयत्न
मुख्यमंत्री चेहऱयाचे नाव लवकरच जाहीर करणार
प्रतिनिधी / पणजी
राज्यात सत्ता मिळाल्यास भंडारी समाजाला मुख्यमंत्रीपद व ख्रिस्ती धर्मियाला उपमुख्यमंत्रीपद देण्याची घोषणा करून आम आदमी पक्षाने गोव्याच्या राजकीय क्षेत्रात गुरूवारी एकच खळबळ उडवून दिली. गोव्याच्या राजकारणात ’आप’चा हा ’मास्टरस्ट्रोक’ असल्याचे बोलले जात असले तरी अशी धूर्त राजकीय खेळी खेळून ’आप’ने सत्ताधारी भाजपसह सर्व पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. आपचे हे ‘युनायटेड गोवा मिशन’ असून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दोनापावला येथे पत्रकार परिषदेत केली.
गत रविवारीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भंडारी समाजाच्या मुख्य कार्यालयास भेट दिली होती. तसेच नंतर समाज समितीनेही मुख्यमंत्रीपद देणाऱया पक्षास पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर श्री. सिसोदिया यांनी केलेल्या या घोषणेस मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
हेच आपचे ‘युनायटेड गोवा’ मिशन
आतापर्यंत भाजप-काँग्रेससह जवळजवळ सर्वच पक्षांनी राजकीय फायद्यासाठी भंडारी समाजाचा वापर केला. त्यातून या समाजात फूट पाडण्याचे राजकारण केले. याउलट आम आदमी पार्टी सर्व समाजातील लोकांना एकत्र जोडण्याचे काम करेल. आम्ही जातीचे राजकारण करत नाही. पण समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होत असल्याची भावना असेल तर ती दूर व्हायला हवी. आम्ही प्रत्येक समाजातील नेत्यास मंत्रिमंडळात स्थान देणार असून, हेच आपचे ‘युनायटेड गोवा’ मिशन असेल, असे सिसोदिया म्हणाले.
गोव्याच्या विकासात मोठे योगदान
सर्वात मोठा समाज असलेल्या भंडारी समाजाचे गोव्याच्या विकासात मोठे योगदान आहे. गोव्याच्या लोकसंख्येत या समाजाचा वाटा 30 टक्के आहे. तरीही स्वातंत्र्याच्या 60 वर्षात या समाजाला रवी नाईक यांच्या रुपाने केवळ एकमेव मुख्यमंत्री मिळाला. परंतु तेसुद्धा केवळ अडीच वर्षेच सत्तेवर राहिले. त्यामुळे भंडारी लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही उणीव, नाराजी भरून काढण्यासाठी आम्ही भंडारी समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री बनवू, असे सिसोदिया म्हणाले.
हे मिशन यशस्वी करण्यासाठी सर्व समाजातील लोकांना एकत्र आणावे लागेल. त्याच उद्देशाने आम्ही ’युनायटेड गोवा’ मिशनची घोषणा करत आहोत. त्याअंतर्गत आमचे नेते आणि कार्यकर्ते प्रत्येकाच्या घरी पोहोचतील, असे त्यांनी सांगितले.
ज्याचा प्रत्येक गोमंतकीयास अभिमान वाटेल
भंडारी समाजातील अशा व्यक्तीला आम्ही मुख्यमंत्री चेहरा बनवू, ज्याचा प्रत्येक गोमंतकीयास अभिमान वाटेल. ती व्यक्ती सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम करेल. आम्ही संपूर्ण गोव्याच्या विकासासाठी काम करू. लवकरच मुख्यमंत्री चेहऱयाचे नाव जाहीर करू, असे सिसोदिया म्हणाले.