अध्यक्ष सिद्धप्पा मुदकन्नवर यांचे आश्वासन : आरोग्य कर्मचाऱयांच्या संकुलाची दुरवस्था
प्रतिनिधी / अथणी
सत्ती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱयांसाठी असलेले निवासी संकुल लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे आश्वासन जिल्हा पंचायतचे शिक्षण व आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष सिद्धप्पा मुदकन्नवर यांनी दिले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालय कर्मचाऱयांसाठी असलेल्या निवासस्थानांना भेट देऊन दुरुस्ती काम लवकर हाती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरवणाऱया सत्ती आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱयांना राहण्यासाठी सुस्थितीत निवासस्थान असणे गरजेचे आहे. निवासस्थाने अतिशय खराब अवस्थेत असून त्याची दुरुस्ती करण्याची विनंती कर्मचाऱयांनी केली होती. त्यानुसार मुदकन्नवर यांनी भेट देऊन पाहणी केली. संकुल दुरुस्तीसाठी ग्राम पंचायतचे सहकार्य आणि आर्थिक मदत घेण्यात येणार आहे. यावेळी आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी डॉ. अनुप गस्ती म्हणाले, सत्ती आरोग्य केंद्र रुग्णांना उत्कृष्ट सेवा पुरवित आहे. या केंद्रात मोठय़ा संख्येने कर्मचारी सेवा बजावत असून त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा पुरविण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. ग्रा. पं. माजी अध्यक्ष मल्लाप्पा हंचिनाळ, अण्णाप्पा हुद्दार, एम. एच. वालीकार, सी. एच. गौडवाडी, एम. वाय. शिंगे, सुनिता हादीमनी, ममता करडी, लक्ष्मी हम्मीनवर, बी. एम. पाटील आदी उपस्थित होते.