भाजपाचे विश्वनाथ दळवी यांची टिका : सर्व पक्षांची दारे बंद झाल्याने दिल्लीवाल्यांशी सोयरिक
प्रतिनिधी /फोंडा
मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी आपल्या आजवरच्या राजकीय कारकिर्दित सत्तेच्या स्वार्थासाठी भाजपा, काँग्रेस, पुन्हा भाजपा असा धरसोडीचा प्रवास केलेला आहे. सत्ता तेथे सुदिन हे आता सर्वांनाच कळून चुकलेले आहे. त्यामुळे येणाऱया निवडणुकीच्या तोंडावर कुठलाच पक्ष त्यांच्याशी युती करण्यास तयार नाही. त्यामुळे दिल्लीच्या आम आदमी पक्षाशी ते सोयरीक जळवू पाहत आहेत, अशी टिका फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी केली आहे.
फोंडा भाजपा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रितेश रवी नाईक, फोंडा भाजयुमोचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, मोर्तु गावडे व शुभम नार्वेकर हे उपस्थित होते.
काही महिन्यांतच मगोला आपची गरज का भासली
काही महिन्यांपूर्वी सुदिन ढवळीकर यांचे बंधू व मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिल्लीवाल्या आपची खिल्ली उडवली होती. गोमंतकीय जनतेला मोफत वीज, बेरोजगारांना भत्ते देण्यास गोव्यात आपची गरज नाही. त्यासाठी मगो पक्ष समर्थ असल्याचे जाहीर विधान त्यांनी केले होते. त्याच मगोचे नेते सुदिन ढवळीकर आज आपचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतात. दिल्ली मॉडलचे गूण गातात, हा त्यांचा निव्वळ राजकीय स्वार्थ आहे. कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेत दिल्लीचा श्वास कोंडला होता, तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी करुन दिल्लीला ऑक्सिजन पुरवठा केला होता. हतबल झाल्यानेच ढवळीकर आज आपची दारे ठोठाऊ लागले आहेत.
ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर भाजपा सरकारवर टिका करताना ढवळीकर यांची भूमिका नेहमीच दुतोंडी राहिली आहे. एकाच विधानावर ते कधीच ठाम राहत नाहीत. सुदिन ढवळीकरांनी बांधकाममंत्री असताना दोनशे मोबाईल टॉवर्स उभारले होते, तर आपल्याच मतदार संघात हे टॉवर्स घालायला ते कसे चुकले, असा प्रश्नही दळवी यांनी उपस्थित केला.
सरकारला विद्यार्थ्यांचे शिक्षण व आरोग्याचीही काळजी आहे
रितेश नाईक म्हणाले, राज्यातील मुलांना शिक्षण देण्यास भाजपा सरकार अपयशी ठरले असते तर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा धाडसी निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला नसता. असा निर्णय घेणारे गोवा हे देशातील पहिले राज्य होते. ऑनलाईन शिक्षणपद्धतीमध्ये ‘ऑनलाईन टिचिंग मोडय़ुल’ हा आणखी एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यासाठी बाराशे शिक्षकांना प्रशिक्षण देऊन ‘प्री रॅकोर्डेड क्लासेस’ तयार करण्यात आले आहेत. ज्यामुळे विद्यार्थी तयार व्हीडिओच्या माध्यमातून शनिवारी व रविवारीही शिकू शकतील. परीक्षेसाठी त्यांना चांगली तयार करता येईल. गोव्यात शंभर टक्के नागरिकांचे लसिकरण पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्टय़ असून त्यानंतर थेट शाळा महाविद्यालयांचे वर्गही सुरु होऊ शकतील, असे रितेश नाईक यांनी सांगितले. सुदिन ढवळीकरांनी शिक्षणात राजकारण आणू नये. सरकारने पूर्ण विचार करुनच ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण व आरोग्याचीही सरकारला काळजी आहे.