वुहानमधील सत्य जगासमोर आणणाऱया पत्रकाराला तुरुंगवास : कोरोनाची खरी माहिती लपविण्यासाठी कट-कारस्थाने
कोरोना महामारीवर वृत्तांकन केल्याने चीनमध्ये महिला पत्रकाराला 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. झैंग झान या पत्रकाराला भांडण करणे आणि अडचणी निर्माण करण्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट शासनाला विरोध करणाऱयांच्या विरोधात अशीच कलमे लावली जातात.
झैंग झान कोण?
37 वर्षीय झैंग झान चीनमध्ये नागरी पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्या वकील देखील आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये झैंग वुहान शहरात पोहोचल्या असताना तेथे कोरोनाचा संसर्ग टोकाला पोहोचला होता. त्यावेळी सरकारचे पूर्ण लक्ष कोरोना नियंत्रणात आणण्यावर असल्याने सेंसरशिप शिथिल होती.
वुहानमध्ये कोरोनाचा फैलाव सुरू झाला असता तेथील लोकांनी स्थिती समाजमाध्यमांवर मांडण्याचे सत्र आरंभिले होते. यातूनच आपणही स्थिती जाणून घेण्यासाठी वुहान येथे पोहोचले, असे झैंग यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. झैंग यांनी शहरातील विविध भागांमध्ये वृत्तांकन केले होते. रुग्णालयातील गर्दी, पत्रकारांना अटक यासारख्या मुद्दय़ांवर तिने वृत्तांकन केले होते. वृत्तांकनादरम्यान तिने चिनी शासनावर कडाडून टीकाही केली. चीनचे शासन ज्याप्रकारे वुहानला हाताळत आहे, ते भीतीदायक आहे, देशासाठी ही मोठी आपदा असल्याचे तिने म्हटले होते.
झैंग यांनी 2019 मध्ये हाँगकाँगमध्ये निदर्शने करणाऱयांचे समर्थन केले होते, याप्रकरणी तिला अटकही करण्यात आली होती. मागील वर्षी 14 मे रोजी झैंग बेपत्ता झाल्या होत्या, काही दिवसांनी तिला शांघायमध्ये अटक करण्यात आल्याचे उघड झाले होते.
झैंगवरील आरोप
नोव्हेंबर 2020 मध्ये झैंग यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. व्हीचॅट, ट्विटर आणि युटय़ूब सारख्या समाजमाध्यमांवर लिखाण करून, चित्रफिती तयार करून आणि अन्य माध्यमांतून असत्य माहिती पसरविल्याचा आरोप आहे. विदेशी प्रसारमाध्यमांना मुलाखती देऊन वुहानमधील कोरोना विषाणूसंबंधी चुकीची माहिती दिल्याचाही आरोप आहे. 28 डिसेंबर रोजी याकरताच झैंग यांना दोषी ठरवत 4 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
चीनची दडपशाही
वुहानमध्ये सार्ससारखा विषाणू फैलावत असल्याचे ली वेनलियांग या डॉक्टरनेच जगासमोर आणले होते. परंतु चीनच्या शासनाने ली यांच्यावर अफवा फैलावण्याचा आरोप केला होता. काही दिवसांनी ली यांचाही कोरोनामुळे मृत्यू ओढवला होता. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने वुहानमध्ये कोरोनाचे वृत्तांकन केल्याप्रकरणी अनेक पत्रकार आणि नागरी पत्रकारांवर कारवाई केली आहे. काही पत्रकार गायबही झाले आहेत. यात चेन क्वीशी आणि फेंग बिन यासारखे पत्रकारही सामील आहेत.
झैंग झान यांच्याप्रमाणे ली झेहुआही नागरी पत्रकार आहेत. त्यांनी युटय़ूबवर चित्रफित अपलोड करून वुहानमधील स्थिती मांडली होती. फेब्रुवारीत त्यांनी युटय़ूबवर एक चित्रफित प्रसारित केली होती, यात पोलिसांची कार पाठलाग करत असल्याचे म्हटले गेले होते. पुढे ली बेपत्ता झाले होते.
प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य नाही
कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट म्हणजेच सीपीजे नुसार प्रसारमाध्यमांवर सेन्सरशिपप्रकरणी इरीट्रिया पहिल्या स्थानावर आहे. तेथे 2001 पासूनच स्वतंत्र प्रसारमाध्यमांवर बंदी आहे. या प्रकरणी चीन 5 व्या स्थानावर आहे. चीनमध्ये मागील वर्षी 47 पत्रकारांना तुरुंगात डांबण्यात आले आहे.