हिवताप कार्यालयाने केला जेसीओ कॉलनीत घर टु घर सर्व्हे
प्रतिनिधी/ सातारा
सदरबाजार परिसरात जेसीओ कॉलनीमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून अनेकजण थंड ताप, अंगदुखी, पाय सुजणे अशा व्याधीने अनेकजण त्रस्त आहेत. त्यांनी कोरोनाची टेस्ट केली तरीही ते निगेटीव्ह आले. आरटीपीसीआरची टेस्ट केली त्यातही ते निगेटीव्ह आले. रक्तातील मलेरियाची तपासणी केली तरीही तसा अहवाल आला नाही. परंतु हा नेमका आजार कोणता आहे हे तेथील स्थानिक सांगतात. त्यानुसार शुक्रवारी जिल्हा हिवताप कार्यालयाकडून प्रत्येक घराचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये बहुतांशी घरामध्ये डेग्यू, चिकनगुनियाच्या आळया आढळून आल्या आहेत. तर कॅनॉललगतच्या असलेल्या हागणदारीमुळे ही साथ आल्याचे स्थानिक सांगत ओहत.
सदरबाजार येथील जेसीओ कॉलनीत अनेक छोटेमोठे बंगले आहेत. त्या बंगल्यातील कोणी ना कोणी गेल्या पंधरा दिवसांपासून थंडताप, अंगदुखी व पायाला सुज येणे, कमरेपासून खाली दुखणे अशा व्याधीने त्रस्त आहेत. त्यांनी कोरोनाची टेस्ट केली. ती निगेटीव्ह आली. एचआरसीटी केली तीही निगेटीव्ह आली. तसेच त्यांनी इतर वैद्यकीय उपचार खाजगी रुग्णालयात व लॅबमध्ये तपासणी केली. त्यामध्येही काहीच दोष आढळून आला नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्याने तेथील नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण झाले आहे. तर काहीं नागरिकांना नवा स्ट्रेन आला की काय अशी भिती निर्माण केली गेली आहे. दरम्यान, तरुण भारतच्यावतीने वृत्त प्रसिद्ध करताच जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने दिवसभर तेथील सर्व घरांमध्ये सर्व्हे करण्यात आला. घराच्या परिसरात पाण्याची साठवण ठिकाणे तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी प्रचंड आळया आढळून आल्या. घरांच्या व बंगल्याच्या परिसरात जुने साहित्य टाकलेले आढळून आले. त्यात पाणी साठून राहिल्याने डेंग्यूच्या आळय़ा आढळून आल्या. घरातील जुन्या पाण्याच्या टाक्यामध्ये साठवून ठेवलेल्या पाण्यातही डेंग्यूच्या आळय़ा आढळून आल्या. तर काही ठिकाणी कुलरमधील पाण्यात आळय़ा मिळून आल्या. त्यामुळे पाहणीस गेलेल्या पथकाने तेथे औषधे टाकण्यात आली. दरम्यान, काही स्थानिक नागरिकांनी त्या पथकास सहकार्य केले नाही. उलट माहिती देण्यास टाळाटाळ केली. पथकाशी हुज्जत घातली.
कॅनॉललगतच्या हागणदारीमुळेच आम्हाला त्रास
आमच्या कॉलनीलगतच कॅनॉल आहे. त्या कॅलॉनचा निर्जन रस्ता आहे. तो झोपडपट्टीतील नागरिकांनी हागणदारी बनवला गेला आहे. तसेच पालिकेने बनवलेल्या दोन बागा आहेत. त्या बागेत कशाही पद्धतीने झाडे लावली गेली आहेत. त्यामुळे सगळी डासांची उत्त्पत्ती केंद्रे तेथे आहेत. आम्ही पालिकेला अनेकदा अर्ज दिले आहेत. हागणदारी बंद करण्याबाबत तरी पालिकेच्यावतीने सांगण्यात येते की त्यांच्यासाठी सार्वजनिक शौचालय बांधले आहे. ते तेथे शौचालयास जात नाही. त्यांच्यावर कारवाई करुन हागणदारी बंद करणे ही पालिकेची जबाबदारी आहे.
अभिजीत कदम जेसीओ कॉलनी डेंग्यू, चिकनगुनियाची शक्यता
आमच्या टिमने सकाळपासून जेसीओ कॉलनीत सर्व्हे केला आहे. हा सर्व्हे गेल्या चार दिवसांपासून केला जातो आहे. 100 टक्के ज्या ज्या ठिकाणी सर्व्हे झाला तेथे आळय़ा आढळून आल्या आहेत. परिसरात अस्वच्छता असल्याने या आळय़ा निर्माण झाल्या आहेत. नागरिकांनीही काळजी घेतली. परिसराची स्वच्छता ठेवली. पावसाचे पाणी साठून ठेवले नाही तर आळया निर्माण होणार नाहीत.
अश्विनी जंगम जिल्हा हिवताप अधिकारी