वार्ताहर/ सदलगा
शहराला जोडणाऱया रस्त्यांबरोबर शहराच्या बाहेरच्या बाजूचा रिंगरोड दुरुस्तीविना धोकादायक बनला आहे. सदलग्याच्या पूर्वेकडील लहान वेशीच्या समोर सिमेंट पाईप घालून सांडपाणी निचऱयाची सोय केली, मात्र, अवजड वाहतुकीमुळे ही सिमेंट पाईप फुटली आहे. फुटलेल्या ठिकाणी धोकादर्शक काठीला कापड अडकवून वाहनधारकांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
सदर पाईप रस्त्याच्या पातळीपेक्षा एक फुटाने वरती असल्याने तिथे चारचाकी वाहनांसह दुचाकी वाहनधारकांनाही फटका बसत आहे. तसेच दुचाकी वाहने उलटण्याचे प्रकारही वाढले आहेत. गोडावूनचा चढाव, हायस्कूल ते बसस्थानक दररम्यानच्या रस्त्यावर खड्डे पडून वाहनधरकांना याचाही त्रास होत आहे. छ. शिवाजी महाराज चौकातल्या उत्तरेकडील रस्त्यावर तर गेल्या अनेक महिन्यापासून सांडपाण्याची सिमेंट पाईप फुटल्याने दुर्गंधी पसरली आहे. सांडपाणी रस्त्यावर येत आहे, दुरुस्तीसाठी नवीन पाईप आणि मुरूम गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यावरच पडून आहेत. मात्र दुर्लक्षामुळे काम ठप्प आहे. यामुळे अपघाताच्या घटना घडण्यासह स्थानिकांना याचा त्रास होत आहे. याची दखल घेत संबंधित कंत्राटदाराने त्वरित अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्याबरोबरच सदर धोकाही दूर करावा, अशी मागणी होत आहे.