‘गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम’ स्पर्धेची अंतिम फेरी उत्साहात : लोकमान्य रंगमंदिर पुन्हा एकदा तुडुंब : रसिकांनी घेतला मनमुराद आस्वाद
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावच्या गायकांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांच्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्यासाठी ‘गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रविवारी झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीवेळी चुरस निर्माण झाली होती. 1970 च्या दशकातील सदाबहार गीते सादर करून तरुण गायकांनी बेळगावकरांची मने जिंकली. प्रत्येक संघाने एकाहून एक सरस अशी 12 गाणी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी पुरस्कृत रसिक रंजन आयोजित ‘गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम 2021’ या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी रंगतदार पद्धतीने पार पडली. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकमान्य सोसायटीच्या संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. लोकमान्यचे संचालक गजानन धामणेकर, अजित गरगट्टी, सुबोध गावडे, सेवंतीलाल शहा, प्रा. अनिल चौधरी, प्रभाकर पाटकर, पंढरी परब, डॉ. डी. पी. वागळे, विठ्ठल प्रभू, परीक्षक भारती कित्तूर, आर. आर. कुलकर्णी, स्पर्धक रिहान मुल्ला, अब्दुल रहिम, अनिस कित्तूर, निधी केळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मारवा, भूपाळी, जोग व शिवरंजनी अशा चार संघांमध्ये ही स्पर्धा पार पडली.
प्रेक्षकांच्या आवडीचे सादर केले गीत
कार्यक्रमामध्ये रसिकांचा सहभाग असावा, या दृष्टीने लकी ड्रॉ ठेवण्यात आले होते. एका भाग्यवान रसिकाला चिठ्ठय़ा दिल्या जात होत्या. जी चिठ्ठी उचलली जाईल ते गाणे त्या संघाला सादर करावे लागले. पहिल्याच लकी ड्रॉमध्ये प्रा. सुभाष सुंठणकर या रसिकाची निवड झाली. त्यांनी काढलेल्या चिठ्ठीमधील गाणे सादर करावे लागले. याच सोबत भाग्यवान रसिकांना आकर्षक भेटवस्तूही देण्यात आल्या.
‘झुमका गिरा रे’ गाण्याने मिळविली वाहवा
1950 पासून 1970 पर्यंत अनेक चित्रपट गीतांनी इतिहास रचला. या काळाला संगीत क्षेत्रातील सुवर्ण क्षण म्हणून ओळखले जाते. या काळात लता मंगेशकर, मोहम्मद रफी यासारख्या दिग्गज गायकांनी गायिलेली गाणी आजही रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत. झुमका गिरा रे हे गीत सादर करून स्पर्धकांनी रसिकांची वाहवा मिळविली. स्पर्धा अधिक रंगतदार झाल्याने एकाहून एक सरस अशी गीते सादर करण्यात आली.
कोरोनानंतर पहिल्यांदाच भरले रंगमंदिर
कोरोनामुळे मार्च 2020 पासून सर्वच कार्यक्रम मर्यादित स्वरुपात करावे लागत होते. रंगमंदिरमध्ये निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत कोणताही कार्यक्रम पार पाडावा लागत होता. परंतु राज्य सरकारने बंधने उठविल्यानंतर आता पूर्ण क्षमतेने कार्यक्रम सुरू झाले आहेत. रविवारी लोकमान्य रंगमंदिर येथे दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगमंदिर तुडुंब भरलेले चित्र पाहायला मिळाले. रसिकांनीही या जुन्या बहारदार गीतांचा मनमुराद आस्वाद घेतला.
तरुण भारतमुळे जगभरात पोहोचला गोल्डन व्हॉईस
गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे थेट प्रक्षेपण तरुण भारतच्या यू टूय़ब चॅनेलवरून केले जात होते. जगभरात पसरलेल्या मराठी व विशेषतः बेळगावच्या रसिकांनी या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला. घरबसल्या या कार्यक्रमाचा आनंद घेता आला. रसिकांनी तरुण भारत टीमचे आभार मानले. तरुण भारत सोबतच लोकमान्य सोसायटीच्या फेसबुक पेजवरून रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.