उपाध्यक्षपदी रिना वायंगणकर यांची निवड : नवनिर्वाचित अध्यक्ष-उपाध्यक्षांचा सत्कार
प्रतिनिधी / कारवार
जिल्हय़ातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱया सदाशिवगड (चिताकुला) ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी स्वाती सूरज देसाई आणि उपाध्यक्षपदी रिना वायंगणकर शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत निवडून आल्या. जिल्हय़ातील सर्वात मोठी आणि जिल्हय़ाचे मुख्यालय कारवारपासून केवळ पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सदाशिवगड ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी कोण निवडून येणार? याबद्दल कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सूरज देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली पॅनेलच्या स्वाती देसाई आणि रिना वायंगणकर यांनी अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर सदाशिवगड ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष आणि नवनिर्वाचित सदस्य तसेच कारवार जिल्हा मच्छीमारी संघटनेचे अध्यक्ष राजू तांडेल यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलच्या सुरेखा दुर्गेकर आणि गायत्री उल्हास कदम यांनी अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सदाशिवगड ग्राम पंचायतीच्या सदस्यांची संख्या 36 इतकी असून निवडणुकीवेळी सर्व सदस्य उपस्थित होते. मतदानाच्यावेळी स्वाती देसाई यांना 21 मते तर सुरेखा दुर्गेकर यांना 15 मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या मतदानाच्यावेळी रिना वायंगणकर यांना 19 मते तर गायत्री उल्हास कदम यांना 17 मते मिळाली. निवडणुकीत बाजी मारलेल्या सूरज देसाई यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनलला भाजप आणि निधर्मी जनता दल समर्थक सदस्यांनी पाठिबा दिला असे सांगण्यात आले. निवडणुकीत पराभूत झालेल्या राजू तांडेल यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलला काँग्रेस समर्थक सदस्यांचा पाठिंबा दिला असे सांगण्यात आले. निवडणुकीत बाजी मारलेल्या स्वाती देसाई आणि रिना वायंगणकर यांचे समर्थकांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. निवडणूक अधिकारी म्हणून कारवार तालुका पंचायतीचे मुख्य कार्यदर्शी बी. अनंतकुमार यांनी काम पाहिले.