प्रतिनिधी / कारवार
तालुक्यातील सदाशिवगड येथील सदाशिवगड शिक्षण संस्था संचालित सदाशिवगड माध्यमिक शाळेने गेल्या 125 वर्षात बजावलेल्या दैदीप्यमान सेवेला तोड नाही, असे उद्गार संस्थेचे माजी अध्यक्ष आणि निवृत्त मुख्याध्यापक शांताराम एस. कुलकर्णी यांनी काढले. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सदाशिवगड हायस्कूलचा शतमानोतर रौप्यमहोत्सव सोहळा सोमवारी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना शांताराम कुलकर्णी म्हणाले, 125 (1895) वर्षापूर्वी सदाशिवगडसारख्या ग्रामीण प्रदेशात भास्कर नाडकर्णी यांनी सदाशिवगड हायस्कूलची स्थापना करून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसारासाठी मुहूर्तमेढ रोवली. गेल्या 125 वर्षात या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी केवळ आमच्या देशातच नव्हेतर प्रगत देशातही विविध क्षेत्रात चमकत आहेत. या प्रसंगी उपस्थित असलेले शाळेचे माजी विद्यार्थी आणि वकील के. आर. देसाई यांनी बोलताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
अध्यक्षस्थांनी सदाशिवगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि कारवारचे माजी आमदार गंगाधर एन. भट होते. ते या प्रसंगी म्हणाले, सदाशिवगड हायस्कूल शतमानोतर रौप्यमहोत्सव साजरा करीत आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. गेली 125 वर्ष शिक्षण क्षेत्राची प्रामाणिक सेवा बजावूनही ही संस्था अद्यापही ताजीतवानी वाटते. यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शिवानंद जी. राणे, पी. एस. नाईक, ज्ञानेश्वर पेडणेकर निवृत्त मुख्याध्यापक एच. आर. नाईक, एल. एन. जोशी, यू. एस. कामत, प्रारंभी हायस्कूलचे मुख्याध्यापक उदयसिंग मुतकेकर यांनी स्वागत केले. अनिल सावंत यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. शेवटी सुरक्षा नाईक यांनी आभार मानले. कार्यक्रमात शिक्षकवर्ग आणि हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून हायस्कूलच्या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.