चोरटय़ांनी दागिने-रोकड लांबविली
प्रतिनिधी / बेळगाव
सदाशिवनगर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी पाऊण लाखाचा ऐवज पळविला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
संतोष ईराप्पा नाटीकर (वय 32, रा. सदाशिवनगर, लास्ट बसस्टॉपजवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
संतोष हे मूळचे विजापूर जिल्हय़ातील मुद्देबिहाळचे आहेत. बुधवारी रात्री ते आपल्या घराला कुलुप लावून गावी गेले होते. गुरुवारी सकाळी त्यांच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी तिजोरी फोडली आहे. 35 हजार रुपये रोख रक्कम, 5 ग्रॅम सोन्याचे दागिने, अडीच तोळे चांदीचे दागिने लांबविले आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत.