विविध वसाहतींमधील समस्या लागणार मार्गी
प्रतिनिधी / बेळगाव
महात्मा गांधी नगर विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या 125 कोटी निधी अंतर्गत शहर व उपनगरांमधील 67 विकासकामे राबविणार आहेत. यामध्ये उपनगरांमधील वसाहतींचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. विश्वेश्वरय्यानगरपासून सदाशिवनगर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या क्वॉर्टर्स पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव आहे.
विकासकामांतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण आणि काँक्रिटच्या गटारी बांधण्यासाठी 125 कोटी अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. विकासकामे राबविण्यासाठी निधी उपलब्ध नव्हता त्यामुळे अनेक वसाहतींमधील समस्या जैसे थे आहेत. विशेषत: अनधिकृत म्हणून ओळखल्या जाणाऱया वसाहतींमधील रस्त्यांची सुधारणा आणि गटारीचे बांधकाम या योजनेंतर्गत हाती घेतले आहे. तसेच शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचा विकासदेखील करणार आहे. सदाशिवनगर, माळमारूती, हिंदवाडी, नानावाडी, टिळकवाडी, वडगाव, खासबाग, गांधीनगर, नेहरू नगर अशा भागातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील विविध रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. क्लबरोडचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या रस्त्याला जोडणारा विश्वेश्वरय्यानगरपासून सदाशिवनगरपर्यंतच्या प्रमुख रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
उत्तर विभागातील पथदीप आणि विद्युतमीटरसाठी निधीची गरज आहे. यापूर्वी काही भागातील पथदीप बसविले आहेत. पण मीटरअभावी पथदीप सुरू नाहीत. काही उद्यानातील विकासकामेदेखील रखडली आहेत. त्यामुळे पथदीप बसविण्याबरोबर विद्युतमीटर, भूमिगत केबल, उद्यानातील हायमास्ट दुरुस्तीसाठी एक कोटीची तरतूद केली आहे. वॉर्ड नं. 54 व 48 मध्ये असलेल्या बिजापूर कॉलनीतील नाला बांधकामासाठी 1 कोटी 75 लाखाच्या निधीची तरतुद केली आहे. दीपक गल्ली, जुने गांधीनगर, अमननगर, हकीम कॉलनी येथील नाल्यांचे बांधकामदेखील करण्यात येणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेली कामे या निधीअंतर्गत मार्गी लागणार आहेत. सदर विकासकामे पुढील पावसाळय़ापूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजेचे आहे.
तिन्ही स्मशानभूमीचा विकास होणार वॉर्ड क्र. 52 मधील माळमारूती परिसरातील शिवालय मंदिराजवळील उद्यानाला संरक्षक भिंत घालण्यात येणार आहे. न्यू वैभवनगर येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. वॉर्ड नं. 42 आणि 43 मधील मार्कंडेयनगरसह शाहूनगर आणि कंग्राळी परिसरातील भागाचा समावेश महापालिकेत करण्यात आला आहे. पण येथील रस्ते आणि गटारीचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे या भागातील विकासकामे राबविण्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे. बसवण कुडची येथील सार्वजनिक स्मशान, मुस्लीम स्मशान, दलित स्मशानाची सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी तीन वर्षांपासून करण्यात येत आहे. पण निधीअभावी ही कामे रखडली होती. तेथील समस्यांचे निवारण करण्यासाठी महात्मा गांधीनगर विकास योजनेतील अनुदानातून बसवण कुडची येथील विविध विकासकामे राबविण्यासह तिन्ही स्मशानभूमीचा विकास करण्यात येणार आहे.