नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आरोग्य विम्याची पॉलिसी एकदा दिल्यानंतर, सध्याच्या आरोग्याच्या स्थितीचे कारण दाखवून विम्याचा क्लेम नाकारता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एका अपीलावर हा निर्णय देण्यात आला.
एखाद्या व्यक्तीने आरोग्य विम्याची पॉलिसी घेतली असेल तर त्याला या पॉलिसीच्या अंतर्गत विमा क्लेम करता येतो. पॉलिसी घेताना ती घेणाऱयाने त्याच्या आरोग्याविषयीची सर्व ज्ञात माहिती देणे आवश्यक आहे. पॉलिसी घेणाऱयाला आपल्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती आहे, असे गृहित धरले पाहिजे. तसेच पॉलिसी घेणाऱयाने त्याच्या आरोग्याविषयीची जी माहिती त्याला असणे अनिवार्य आहे, ती सर्व दिली पाहिजे. मात्र, एकदा पॉलिसी दिली गेल्यानंतर ती देणाऱयाला विम्याचा क्लेम नाकारता येणार नाही, असे या निर्णयात स्पष्ट केलेले आहे.
प्रकरण काय आहे
नंदा नामक व्यक्तीने ओव्हरसीज बिझनेस अँड हॉलीडे पॉलिसी घेतली होती. त्यानंतर ते अमेरिकेला गेले. अमेरिकेत गेल्यानंतर त्वरित त्यांन हृदयविकारचा झटका आला. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. नंतर त्यांनी विमा कंपनीकडून भरपाई मागितली. मात्र, रुग्णाने त्याला मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास आधीपासून आहे ही बाब पॉलिसी घेताना उघड केली नव्हती, हे कारण दाखवून कंपनीने क्लेम नाकारला. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले.
तथापि, वैद्यकीय चाचणी घेऊन एकदा पॉलिसी देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीचा क्लेम विमा कंपनी नाकारु शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. हे अपील पॉलिसी धारकाने केले होते. त्याची सुनावणी न्या. चंद्रचूड आणि न्या. बी. व्ही. नागरत्ना यांच्यासमोर करण्यात आली.