कोरोना प्रतिबंधक लसीसंबंधी ‘डब्ल्यूएचओ’चा निर्वाळा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्या जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची गरज नसल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. आपल्याला सर्वात आधी जगातील गरीब देशांचे पूर्णपणे लसीकरण करण्याबाबत विचार करणे गरजेचे आहे. त्यानंतरच श्रीमंत देशांच्या लसीच्या बूस्टर डोसबाबत विचार केला पाहिजे, असे स्पष्टीकरण ‘डब्ल्यूएचओ’च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी यांनी दिले आहे. तसेच सध्या जगभरात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहेत. मात्र, लस योग्य संख्येत, योग्य ठिकाणी पोहोचत नाहीत हेच मोठे चिंतेचे कारण असल्याचे ‘डब्ल्यूएचओ’चे वरि÷ सल्लागार ब्रूस एल्वार्ड यांनी म्हटले आहे.
लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बूस्टर डोस घेतल्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होईल, असे अद्याप सिद्ध झालेले नाही. यासंबंधी अजूनही संशोधन सुरू असून योग्य अभ्यासाअंतीच बूस्टर डोसचा वापर करण्यासाठी अनुमती दिली जाण्याचे संकेत मिळत आहेत. जगभरातील कोरोनाच्या ताज्या आकडेवारीवरून सध्या बूस्टर डोसची गरज नाही. जोपर्यंत गरीब देशांमधील सर्वांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत जगातील श्रीमंत देशांनी आपल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबत विचारही करु नये. दरम्यान, गरीब देशांतील नागरिकांना लसीचे दोन डोस उपलब्ध करून देण्याच्या लक्ष्यापासून आपण अद्यापही दूर आहोत, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. जगातील उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, मे महिन्यात प्रत्येकी 100 लोकांसाठी सरासरी 50 डोस उपलब्ध होते आणि त्यानंतर आतापर्यंत ही संख्या दुप्पट झाली आहे. तेच जर कमी उत्पन्न असलेल्या देशांबाबत बोलायचे झाले तर, येथे पुरवठय़ाच्या कमतरतेमुळे प्रत्येक 100 लोकांमागे लसीची मात्रा सरासरी 1.5 डोस एवढी आहे.
अमेरिकेची बूस्टर डोसची घोषणा
दरम्यान, 20 सप्टेंबरपासून देशातील सर्व नागरिकांना कोरोनाचा बूस्टर डोस देण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. अमेरिकन सरकारने डेल्टा व्हेरिअंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेतला आहे. देशात तिसरी लाट रोखण्यासाठी आतापासूनच सावधानता बाळगली जात आहे.