उपलब्ध झाल्यावरही साइड इफेक्ट्स शक्य : जगभरात पुरवठा करण्यासाठी 8,000 जंबो जेट्स लागणार
कोरोनावरील लस कधी येणार, कधीपर्यंत मिळणार, सर्वप्रथम कुठे मिळणार, कशी मिळणार, किंमत किती असणार आणि जगातील प्रत्येक माणसापर्यंत ती कशी पोहोचणार हे प्रश्न आज जगातील जवळपास प्रत्येकाच्या डोक्यात घोळू लागले आहेत. जगभरातील 20 पेक्षा अधिक औषध कंपन्या आणि सरकारे दिवसरात्र लस निर्मितीसाठी झटत आहेत. लससंबंधी दररोज किती प्रगती झाली याचा त्यांच्याकडून आढावा घेतला जातोय. परंतु आतापर्यंत केवळ 10 टक्के लसी चाचण्यांमध्ये यशस्वी ठरल्या आहेत. एका अनुमानानुसार लस निर्मिती झाल्यावर त्याच्या जगभरातील पुरवठय़ासाठी सुमारे 8,000 जंबो जेट्सची गरज भासणार आहे.
यशस्वी ठरणार का?
कुठलीही लस आल्यावर प्रभावी ठरेल की नाही हे आताच सांगता येणार नाही, सर्व कंपन्या सद्यकाळात युद्धपातळीवर लसनिर्मिती करू पाहत आहेत. दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लसीकरणानंतर निर्माण होणारी प्रतिकारकशक्ती सुरक्षा पुरविणारी आहे की नाही हे कालौघातच समजणार असल्याचे एम्समधील रुमेटोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉक्टर उमा कुमार यांनी म्हटले आहे.
लसीचा उद्देश
लसीचे अनेक प्रकार असतात आणि त्यांच्यामुळे लोकल इम्युनिटी विकसित होते. लस दिल्यावर शरीरात पुन्हा संसर्ग वाढत नाही. कोरोनाच्या लसीने 80 टक्के संसर्गावर नियंत्रण मिळविल्यास ती यशस्वी ठरल्याचे मानले जावे, उर्वरित 20 टक्के लोक समूह प्रतिकारकशक्तीने सुरक्षित राहतील. कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठी 60 ते 70 टक्के लोकांना लस देण्याची गरज असल्याचे मानले जात आहे.
लसनिर्मितीचा कालावधी
कुठलीही लस एखादा संक्रामक आजार संपुष्टात आणण्यासाठी तयार केली जाते. सर्वसाधारणपणे लस निर्मितीला सुमारे 5 ते 10 वर्षांचा कालावधी लागतो.तरीही याच्या यशाची कुठलीच हमी नसते. लसमुळे आजपर्यत केवळ एकच साथ पूर्णपणे संपुष्टात आली आहे. स्मॉलपॉक्सचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी सुमारे 200 वर्षे लागली आहेत. याचबरोबर पोलियो, टिटनस, टीबीसाठीही लस तयार करण्यात आली असून त्या बऱयाचअंशी यशस्वी ठरल्या आहेत, परंतु आजही आम्ही या आजारांसोबत जगत आहोत.
गरीब देशांसमोरील व्यवस्था
लसखरेदीवरून प्रत्येक देशाची स्थिती एकसारखी नाही. लस निर्माण झाल्यावर ती सर्व देशांसाठी उपलब्ध व्हावी, अधिक पैसे असलेल्यांना ती मिळू नये असे उद्गार जागतिक आरोग्य संघटनेच्या सहाय्यक संचालक डॉक्टर मारियाजेला सिमाओ यांनी काढले आहेत. डब्ल्यूएचओ एक विशेष कृतिदल निर्माण करणार आहे. याचबरोबर वॅक्सीन अलायन्स ऑफ गव्हर्नमेंट अँड ऑर्गनायजेशनशी त्याची चर्चा सुरू आहे. आतापर्यंत 80 श्रीमंत देशांनी ग्लोबल वॅक्सीन प्लॅनमध्ये भाग घेतला आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत 3 अब्ज डॉलर्सचा निधी जमवून प्रत्येक देशाला लस उपलब्ध करण्याचा उद्देश आहे. परंतु यात अमेरिका सामील नाही.
वितरण व्यवस्था
लस वितरणाच्या कामात जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स यासारख्या संस्थांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. या संस्थांना जगभरात एक कोल्ड चेन तयार करावी लागणार आहे. यात कूलर ट्रक, सोलर फ्रिज यासारख्या व्यवस्थाही कराव्या लागतील, जेणेकरून लस योग्य तापमानात ठेवता येईल आणि सहजपणे कुठेही पोहोचविता येईल. सर्वसाधारणपणे लस 2-8 अंश सेल्सिअस तापमानात ठेवली जाते.
लस कधीपर्यंत येणार
कोरोना विषाणू विरोधात लसीची चाचणी मोठय़ा प्रमाणावर जगभरात सुरू आहे. यात हजारो लोक सामील आहेत. जगभरात सध्या सुमारे 20 कंपन्या चाचण्या कर त असून यातील सुमारे 10 टक्केच यशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत. लस तयार करण्यासाठी काही महिन्यांमध्येच मोठय़ा संख्येत कंपन्या आणि गुंतवणुकदार सरसावले आहेत. रशियाने स्पुतनिक-5 नावाची लस सादर केली असून ऑक्टोबरपासून लोकांना देण्यास प्रारंभ होणार आहे. चीननेही स्वतःच्या सैनिकांना ही लस दिल्याचा दावा केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत सामील असलेल्या लसींची सध्या तिसऱया टप्प्यातील चाचणी सुरू आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत लसनिर्मितीचे काम पूर्ण करणार असल्याचे यातील काही कंपन्यांचे म्हणणे आहे.
सर्वप्रथम कुणाला मिळणार
लस उपलब्ध झाल्यावर ती सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी आणि अतिजोखिम असलेल्या गटाला दिली जाणार आहे. यानंतर 20 टक्के लोकसंख्येकरता ती उपलब्ध करण्यात येईल. जगभरातील देश विविध कंपन्यांशी करार करत आहेत. याचबरोबर लसनिर्मिती आणि खरेदीसाठी देशांनी गट निर्माण केले आहेत. ब्रिटनने 6 कंपन्यांसोबत 10 कोटी डोस खरेदीचा करार केला आहे. तर अमेरिकेच्या प्रशासनाने जानेवारीर्पंत 30 कोटी डोसची व्यवस्था केल्याचे समजते.
लसीची किंमत
लस कशाप्रकारची आहे आणि किती डोसची मागणी झाली आहे यावर त्याची किंमत अवलंबून असणार आहे. मॉडर्ना या कंपनीला लस विक्रीची अनुमती मिळाल्यास तिच्याकडून एका डोसचा दर 3-4 हजारांदरम्यान राहू शकतो. भारतात एका डोसची किंमत 250-300 रुपये ठेवणार असल्याचे सीरम इन्स्टिटय़ूटने म्हटले आहे.
2021 च्या अखेरपर्यंत सुरळीत होणार नाही जीवन
प्रख्यात कोरोना विशेषज्ञ डॉ. अँथनी फॉसी यांचे विधान
अमेरिकेचे प्रख्यात साथरोगतज्ञ डॉ. अँथनी फॉसी यांनी 2021 च्या अखेरपर्यंत जीवन सुरळीत होण्याची अपेक्षा नसल्याचे विधान केले आहे. कोरोनावरील लस मदत करणार असली तरीही त्याच्याही मर्यादा आहेत. कोरोनावरील कुठल्याही एका लसीला 2020 च्या अखेरपर्यंत किंवा 2021 मध्ये मंजुरी मिळू शकते असे त्यांनी म्हटले आहे.
लसीला चालू वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा पुढील वर्षी मंजुरी मिळाली तरीही ती सर्व लोकांसाठी त्वरित उपलब्ध होणार नाही. मंजुरी मिळाल्यावर लसीच्या मोठय़ा प्रमाणावर उत्पादनाची आणि पुरवठय़ाची गरज भासणार आहे. 2021 च्या मध्य किंवा अखेरपर्यंत लोकसंख्येच्या मोठय़ा हिस्स्याला लस देणे आणि त्यांना सुरक्षित करण्याचे काम पूर्ण होताना दिसत नसल्याचे ते म्हणाले.
कोरोनावरील लस फ्रीजरमध्ये ठेवावी लागणार आहे. लसीच्या कोल्ड स्टोरेजसंबंधीही समस्या निर्माण होते. एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी ती नेण्यासाठी कोल्ड चेन तयार करावी लागते असे त्यांनी सांगितले आहे.
रेस्टॉरंट-बार आणि अन्य ठिकाणी लोकांची गर्दी होण्याच्या घटनेवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तरुण गंभीर आजारी होणार नसल्याचा विचार करू शकतात, परंतु त्यांच्यामुळे बाधित होणारे अन्य आजारी पडतील याचा विसर पडू नये. लोक कोरोनासंबंधी चुकीची माहिती फैलावत असल्याने विषाणूच्या विरोधातील लढाई अधिकच अवघड ठरल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
कुठल्याही पुराव्यांशिवाय एखादे औषध अत्यंत उपयुक्त असल्याचा केला जाणारा दावा त्रासदायक आहे. अशाप्रकारचे दावे फेटाळण्यात माझा आणि अन्य तज्ञांचा मोठा वेळ वाया जात असल्याचे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.