नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जागतिक स्तरावर तिन्ही क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम फलंदाज कोण, असा प्रश्न विचारला तर विराट कोहलीसह स्टीव्ह स्मिथ, केन विल्यम्सन व जो रुट ही नावे प्राधान्याने नजरेसमोर येतील. पण, विराटची अविश्वसनीय स्तरावरील तंदुरुस्ती व कॉपीबुक स्टाईल फटक्यांवरील अफाट हुकूमत यामुळे तोच सध्याच्या घडीचा सर्वोत्तम फलंदाज ठरतो, असे माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार इयान चॅपेलना वाटते. यूटय़ूबवर राधाकृष्णन श्रीनिवासन यांनी आयोजित केलेल्या ‘आरके शो’मध्ये चॅपेल यावेळी बोलत होते.
विराटच्या नेतृत्वगुणांची देखील त्यांनी येथे मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘विराट सामना जिंकण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत सोडत नाही. पण, त्याचवेळी वेळप्रसंगी पराभव स्वीकारावा लागत असेल तर त्यासाठीही विराट खिलाडूवृत्तीने तयार असतो, असे ते म्हणाले.
‘तिन्ही क्रिकेटमध्ये विराट जे साम्राज्य गाजवतो आहे, त्याला तोड नाही. विशेषतः मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तर फक्त जणू त्याचीच हुकूमत चालते’, असे चॅपेल याप्रसंगी म्हणाले. ‘ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीतील भक्कम आधारस्तंभ स्टीव्ह स्मिथ हा विराट कोहलीच्या आसपास देखील आढळून येत नाही’, असे माजी इंग्लिश फलंदाज केविन पीटरसनने अलीकडेच म्हटले होते. त्याला चॅपेल यांनी एका अर्थाने सहमती दर्शवली.
तिन्ही क्रिकेट प्रकारातील कर्णधार विराट कोहलीने आजवर 70 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली असून एकत्रित 20 हजार पेक्षा अधिक धावांचा डोंगर रचला आहे. शिवाय, तिन्ही क्रिकेट प्रकारात त्याची सरासरी देखील 50 पेक्षा अधिक आहे.
कोहलीच का सर्वोत्तम वाटतो, याची कारणमीमांसा करताना चॅपेल पुढे म्हणाले, ‘विराट ज्यावेळी फलंदाजी करत असतो, त्यावेळी त्याचा दृष्टिकोन प्रचंड भावणारा असतो. भारतीय संघ मागील वेळी ऑस्ट्रेलिया दौऱयावर होता, त्यावेळी आम्ही त्याची मुलाखत घेतली. फक्त आकर्षक वाटणारे फटके खेळणे मला आवडत नाही, असे उत्तर विराटने दिले होते, त्याची आजही आठवण ताजी आहे. मी स्वतः खेळत असताना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये व्हीव रिचर्ड्स सर्वोत्तम फलंदाज होता. पण, तो ही सरळ बॅटनेच खेळायचा. तरीही जलद गतीने धावा फटकावण्यात त्याचा कोणीही हात धरु शकत नसे. विराट कोहलीचे देखील असेच आहे. विराट पारंपरिक फटके खेळतो आणि त्याच बळावर प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणतो’.