वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विंडीजचा सलामीचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने तूर्ताला तरी आपण निवृत्तीची योजना आखलेली नाही, असे स्पष्टीकरण वृत्तसंस्थेशी बोलताना दिले. आपले लक्ष आयसीसीच्या आगामी दोन विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर असल्याचे त्याने सांगितले.
2021 सालातील आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतामध्ये तसेच 2022 सालातील टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. या दोन आगामी स्पर्धांमध्ये माझा खेळण्याचा मानस असल्याचे 41 वर्षीय गेलने सांगितले. मध्यंतरी ख्रिस गेल क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त होणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये चालू होती. पण गेलच्या या विधानामुळे त्याच्या निवृत्तीबाबत साशंकतेवर आता खुलासा झाला आहे. आणखी पाच वर्षे क्रिकेट खेळण्याची इच्छा गेलने व्यक्त केली. 45 व्या वषी आपण क्रिकेटमधून कदाचित निवृत्त होईन, असे संकेत त्याने दिले. अल्टीमेट क्रिकेट चॅलेंज (युकेसी) स्पर्धेच्या निमित्ताने तो दुबईत सध्या वास्तव्य करीत आहे. दुबईमध्ये 16 सामन्यांची क्रिकेट स्पर्धा भरविली जाणार असून या युकेसी स्पर्धेमध्ये भारताचा युवराज सिंग, मॉर्गन, आंदे रस्सेल, केव्हिन पीटरसन, रशिद खान सहभागी होत आहेत. युकेसी ही स्पर्धा नव्या स्वरुपात खेळविली जाणार असून या स्पर्धेसाठी क्रिकेटचे नवे नियम अमलात आणले जाणार आहेत. साखळी टप्प्यात सामना जिंकणाऱया संघाला दोन गुण दिले जातील. प्रत्येक सामन्यात चार डाव खेळविले जाणार असून प्रत्येक डाव 15 चेंडूंचा राहील. संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या तेराव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गेलने सात सामन्यात 288 धावा जमविताना तीन अर्धशतके झळकविली होती.