धुरळा उडणे म्हणजे काय असते ते ‘धुरळा’ या चित्रपटाचा टिजर सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांच्याच लक्षात आले होते. नुकताच श्रमिक जिमखाना मैदान येथे ‘धुरळा’ चित्रपटाचा ट्रेलर सर्व कलाकारांच्या उपस्थितीत सार्वजनिक कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला आणि पाहता पाहता टिजरप्रमाणेच ट्रेलरही सोशल मीडियाच्या ट्रेंडिग लिस्टमध्ये सामील झाला. एका दिवसात या ट्रेलरला तब्बल 10 लाख व्हय़ूज मिळाले. नव्या वर्षात प्रदर्शित होणाऱया पहिल्याच चित्रपटामुळे नव्या वर्षाची धुरळादार सुरुवात होणार असल्याची सर्वत्र चर्चा आणि उत्सुकता आहे. येत्या 3 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
मोठय़ा गॅपनंतर सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी एकत्रितपणे पुनरागमन करत आहेत. तर आजपर्यंत सोशिक सुनेच्या भूमिकेत दिसलेल्या अलका कुबल यांची सरप्राईज करणारी व्यक्तिरेखा धुरळातून आपल्या भेटीस येणार आहे. सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, प्रसाद ओक, अमेय वाघ यांच्या फर्स्ट लूकच्या चर्चेचा ‘धुरळा’ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर उडालाय. ‘धुरळा’ हा चित्रपट निवडणुकीची रणधुमाळी, प्रचाराची लगबग, राजकीय शत्रुत्व, महिलांचे राजकारणातले अस्तित्व, विजयाचा गुलाल, राजकारणात डोकावू पाहणारी तरुणाई असे राजकारणाचे विविध रंग या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. अलका कुबल, अंकुश चौधरी, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, सुलेखा तळवलकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, प्रियदर्शन जाधव आणि उमेश कामत अशी चित्रपटाची तगडी स्टारकास्ट आहे. सध्या इंस्टाग्रामवर धुरळाचा फिल्टर प्रचंड लोकप्रिय असून, धुरळा फिल्टर केलेले व्हीडिओज्, फोटोज्, प्रोफाईल फोटोज् प्रचंड व्हायरल होत आहेत. मराठी चित्रपटासाठी इंस्टाग्रामने स्वत:हून फिल्टर प्रदर्शित करण्याचीही पहिलीच वेळ आहे.