कंपनीचे अध्यक्ष हरिंद्र सिंग यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात डिसेंबर महिन्यात सनबर्न आयोजित करण्याचा विचार चालविला असला तरीही हे आयोजन पूर्णतः कोरोनाच्या स्थितीवर अवलंबून असेल आणि स्थिती नियंत्रणात आली तरच महोत्सव होईल, अशी ठाम ग्वाही सनबर्नचे आयोजक असलेल्या पर्सेप्ट या कंपनीचे अध्यक्ष हरिंद्र सिंग यांनी दिली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोमंतकीयांचे आरोग्य धोक्यात घालून आम्हाला पैसा कमावयाचा नाही, आम्ही संधीसाधू नव्हे, महोत्सव आयोजित करण्यासारखी परिस्थिती नसेल तर तो होणार नाही, भले आम्हाला कितीही नुकसानी सहन करावी लागली तरी चालेल, असे सिंग यांनी स्पष्ट केले.
गतवर्षीही हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी एक लाख लोक सहभागी झाले होते. यंदा ती संख्या केवळ 10 हजारांपर्यंत मर्यादित ठेवण्यात येणार असून सर्व मार्गदर्शक तत्वांचे कठोर पालन करण्यात येईल. सध्या आम्हाला तत्वतः मान्यता मिळालेली असून कोरोनाची स्थिती पाहूनच सरकार अंतिम मान्यता देईल, असे ते म्हणाले.
या महोत्सवाच्या तयारीसाठी सुमारे महिनाभर काम करावे लागते. या काळात हजारो गोमंतकीयांना रोजगार उपलब्ध होत असतो. तसेच हॉटेल्स, शॅक्स, टॅक्सी, बसेस, विमानसेवा यांनाही काम मिळून राज्याच्या अर्थव्यवस्थेस मोठा हातभार लागतो, पर्यटन व्यवसायालाही त्यातून उत्तेजन मिळते, असे सिंग म्हणाले.
येत्या डिसेंबर महिन्यात 27, 28 व 29 रोजी या महोत्सवाचे आयोजन निश्चित करण्यात आले आहे. त्याची तिकीटविक्रीही ऑनलाईन प्रारंभ झालेली आहे. तरीही महोत्सव होईलच अद्याप नक्की नाही. राज्यात आजही कोरोनाचा प्रभाव आहे. डिसेंबरपर्यंत तो कितपत कमी होईल हेही कुणीच ठामपणे सांगू शकत नाहीत. अशा परिस्थितीत एखादवेळी महोत्सव रद्द करावा लागलाच तर आम्ही सर्व लोकांचे तिकीटाचे पैसे परत देणार आहोत, असे सिंग यांनी स्पष्ट केले.
गत 14 वर्षांपासून आम्ही या महोत्सवाचे आयोजन करत आहोत, पण आजपर्यंत कोणताही बेकायदेशीरपणा केलेला नाही. कोणतीही चूक केलेली नाही. मान्यता न घेता एकही कार्यक्रम केलेला नाही. यापुढेही तसे होणार नाही. यंदा महोत्सवात किती व कोणते कलाकार सहभागी होतील हे अद्याप ठरलेले नाही. आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली नसल्याने विदेशी कलाकार जास्त असणार नाहीत, एवढेच नव्हे तर आम्ही जरी 10 हजार प्रेक्षक म्हटले असले तरी प्रत्यक्षात कसा प्रतिसाद मिळेल हेही आताच सांगता येणार नाही, अशी माहिती सिंग यांनी दिली.