पुणे / वार्ताहर :
नालासोपारा स्फोटक व हत्यार साठा आणि सनबर्न फेस्टिव्हल 2017 घातपात कटाच्या गुह्यातील आरोपी प्रताप जुदीष्टर हाजरा ऊर्फ प्रताप हाजरा (वय 34, रा. नैनापूर, पश्चिम बंगाल) यास दहशतवादविरोधी पथकाने पश्चिम बंगालमधील उष्टी येथून शिताफीने जेरबंद केले. आरोपी प्रताप हाजराविरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता आणि त्याच्या मागावर अनेक दिवसांपासून एटीएसचे पथक होते.
याबाबत आारोपीविरोधात एटीएस काळाचौकी पोलीस स्टेशन, मुंबई येथे बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा, स्फोटक पदार्थाचा कायदा, आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाजरा याने या गुह्यातील इतर आरोपींना गावठी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्याचप्रमाणे डिसेंबर 2017 मध्ये पुण्यातील बावधन येथे आयोजित सनबर्न फेस्टिव्हल या पाश्चात्य संगीताच्या कार्यक्रमात घातपात घडवून तो उधळून लावण्याच्या कटात तो सामील होता. एटीएसच्या पथकाने कोलकाता पोलिसांच्या मदतीने आरोपीला पश्चिम बंगालमधून जेरबंद केले आहे. त्याला मुंबईतील न्यायालयात हजर केले असता 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.