वृत्तसंस्था/ अबु धाबी
सनरायजर्स हैदराबाद व आरसीबी यांच्यात शुक्रवारी एलिमिनेटर लढत होत असून संघर्ष करीत असलेल्या आरसीबीविरुद्ध आणखी एक सफाईदार प्रदर्शन करीत आयपीएलमध्ये आगेकूच करण्यासाठी सनरायजर्स सज्ज झाले आहे. सायंकाळी 7.30 पासून या सामन्याला सुरुवात होत आहे.
प्रारंभीच्या टप्प्यात संथ सुरुवात करणाऱया हैदराबादने उत्तरार्धात योग्यवेळी शानदार प्रदर्शन करीत आरसीबीला मागे टाकून तिसरे स्थान पटकावत प्लेऑफमध्ये स्थान मिळविले. या स्पर्धेच्या उत्तरार्धात दोन्ही संघांची कामगिरी परस्परविरुद्ध झाली आहे. आरसीबीने सलग चार पराभव स्वीकारत साखळी फेरीनंतर चौथे स्थान मिळविले तर हैदराबादने विजयाची हॅट्ट्रिक नोंदवत कोहलीच्या संघाला मागे टाकले. शेवटच्या तीन सामन्यांत हैदराबादने सर्वोत्तम प्रदर्शन घडविताना दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी व आघाडीवर असणाऱया मुंबई इंडियन्सला नमवित प्लेऑफमधील चौथा संघ होण्याचा मान मिळविला. त्यामुळे शुक्रवारच्या सामन्यात त्यांचे मनोबल खूपच उंचावलेले असणार आहे.
हैदराबादच्या शेवटच्या काही सामन्यांतील यशाचे श्रेय वॉर्नर व वृद्धिमान साहा या सलामीवीरांना जाते. ही जोडी आघाडीला यशस्वी ठरली असून त्यांनी दोन शतकी भागीदारी केल्या आहेत. दिल्लीविरुद्ध 107 आणि मुंबईविरुद्ध 151 धावांच्या भागीदारीचा त्यात समावेश आहे. कर्णधार वॉर्नरने कप्तानाला साजेशी कामगिरी करीत 14 सामन्यांत 529 धावा फटकावल्या असून सर्वाधिक धावा जमविणाऱयांत त्याने दुसरे स्थान मिळविले आहे. साहाने तीन सामन्यात 184 धावा जमवित संघव्यवस्थापनाने आपल्याला 11 सामन्यांत संघाबाहेर ठेवून चूक केली असल्याचेच दाखवून दिले. या दोघांची इतकी जबरदस्त कामगिरी झाली आहे की मनीष पांडे, केन विल्यम्सन, प्रियम गर्ग, जेसॉन होल्डर यांना फारशी चिंताच करावी लागली नाही.
गोलंदाजीत हैदराबादला संदीप शर्मा, होल्डर, शाहबाज नदीम, टी. नटराजन, रशिद खान यांच्यात योग्य कॉम्बिनेशन मिळाले असून शुक्रवारच्या सामन्यात ते हेच कॉम्बिनेशन कायम ठेवण्याची अपेक्षा आहे. पॉवरप्लेमध्ये संदीप शर्माने अतियश प्रभावी कामगिरी केली असून नटराजनने डेथओव्हर्समध्ये चमक दाखवली आहे. मधल्या षटकांत रशिद खानने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, पण होल्डर व नदीमच्या समावेशामुळे त्यांच्या गोलंदाजीत समतोलपणा आला आहे. एखादी हलकीशी चूक देखील आपल्याला खूप महाग पडू शकते, याची जाणीव आरसीबीला असल्याने त्यांना आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. सलग चार पराभव स्वीकारावे लागले असल्याने त्यांचे मनोबलही बरेचसे खचलेले आहे. पण मागील निकालांवर विचार करत बसण्याची ही वेळ नाही याची जाणीव कोहलीला असून जेतेपद मिळवायचे असल्यास सलग तीन विजय मिळविणे आवश्यक आहे, यावर त्याचे लक्ष केंद्रित झालेले असेल.
मात्र ही बाब प्रत्यक्षात साकार करणे त्यांना तितके सोपे जाणार नाही. कारण या संघातील जोम आता बराचसा कमी झाला आहे. दिल्लीविरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. फिंचच्या जागी आणलेल्या फिलिप जोशने अधूनमधून चांगले प्रदर्शन केले आहे. पण त्याला मोठय़ा खेळी करता आलेल्या नाहीत. त्यामुळे फिंचला पुन्हा सलामीस आणण्याचा विचार कोहली करीत असणार. देवदत्त पडिक्कलने सातत्यपूर्ण खेळ केला आहे, पण कोहलीला अजून कामगिरी उंचवावी लागणार आहे. त्याचा स्ट्राईकरेटही कमी झाल्याने त्यावर सगळय़ांचे लक्ष जात आहे. कोहली व डीव्हिलियर्स यांनाच मोठी जबाबदीर स्वीकारावी लागणार असून मॉरिस, दुबे, सुंदर यांच्याकडूनही त्यांना साथ मिळणे गरजेचे आहे. सैनी या सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्याच्या साथीला सिराज, उदाना, मॉरिस असतील. सुंदर व चहल यांनी फिरकी गोलंदाजीचा भार व्यवस्थित सांभाळला आहे.
सनरायजर्स हैदराबाद : वॉर्नर (कर्णधार), बेअरस्टो, विल्यम्सन, पांडे, गोस्वामी, विराट सिंग, प्रियम गर्ग, साहा, अब्दुल समद, विजय शंकर, नबी, रशिद खान, होल्डर, अभिषेक शर्मा, बी.संदीप, संजय यादव, फॅबियन ऍलेन, भुवनेश्वर, खलील अहमद, संदीप शर्मा, नदीम, कौल, स्टॅन्लेक, टी. नटराजन, थम्पी.
आरसीबी : कोहली (कर्णधार), डीव्हिलियर्स, पार्थिव पटेल, फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, यजुवेंद्र चहल, नवदीप सैनी, स्टीन, पवन नेगी, उदाना, दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंग, मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, ऍडम झाम्पा.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.