पुणे / प्रतिनिधी
चौथ्या क्रमांकावर असलेल्या सनरायजर्स हैदराबादचा सामना तळातील चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध रंगणार आहे. चेन्नईसाठी हा महत्त्वाचा सामना असेल. हा सामना हरल्यास चेन्नईसाठी प्ले-ऑफच्या आशा मावळतील. मागील सिझनमधील ऑरेंज कॅप होल्डर ऋतुराज गायकवाडच्या फॉर्मची चिंता चेन्नईला भेडसावत आहे.
पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सायंकाळी साडेसातपासून हा सामना रंगणार आहे. हैदराबादने आठ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, चेन्नईने आठपैकी दोनच सामने जिंकले आहेत.
हैदराबादने यंदा आश्वासक सुरुवात केली आहे. केन विल्यम्सन, निकोलस पूरन, एडन मॅरक्रम, ग्लेन फिलीप, राहुल त्रिपाठी, अब्दुल समद, प्रियम गर्ग यांच्यावर सनरायर्झस हैदराबादच्या फलंदाजीची मदार असणार आहे. अभिषेक शर्मा, इडन मार्करम हे उत्तम फॉर्ममध्ये आहेत. विल्यम्सन, पूरन यांना फलंदाजीत उत्तम कामगिरी बजवावी लागेल. भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल गोलंदाजीची बाजू सांभाळतील. उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, रोमारिओ शेफर्ड, अभिषेक शर्मा अष्टपैलू खेळाडूंची भूमिका बजावताना दिसतील.
चेन्नईला या हंगामात फारशी चमक दाखवता आली नाही. चेन्नईकडे ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जडेजा, मोईन अली, शिवम दुबे, डेव्हॉन ब्रेव्हो अशी फलंदाजी आहे. चेन्नईला गायकवाडच्या फॉर्मची चिंता आहे. चेन्नईला मॅच जिंकायची असेल, तर त्याला धावा कराव्या लागणार आहेत. एखाददुसरी मॅच सोडल्यास उत्थप्पा-गायकवाडला चेन्नईसाठी चांगली सलामी देता आलेली नाही. मुकेश चौधरी, प्रिटोरियस यांच्यावर फास्ट बॉलिंगची धुरा असणार आहे. महीश तीक्षणा याच्यावर चेन्नईची फिरकीची मदार असणार आहे.