वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयपीएलच्या गेल्या पाच मोसमात सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ म्हणजे सनराजयर्स हैदराबाद. पण यावेळी त्यांना मध्यफळीतील फलंदाजी सुधारण्यावर जास्त लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. यासाठी त्यांनी केदार जाधवकडून अपेक्षा ठेवली आहे.
2016 मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली या संघाने एकमेव विजेतेपद मिळविल्यानंतर सनरायजर्सने प्रत्येक वेळी प्लेऑफपर्यंत मजल मारली, मात्र त्यांना दुसऱयांदा जेतेपद मिळविण्यात अपयशच आले आहे. 2017 मध्ये एसआरएचला एलिमिनेटर लढतीत केकेआरकडून पराभूत व्हावे लागले तर त्यापुढील वर्षी त्यांना अंतिम फेरी गाठूनही चेन्नई सुपरकिंग्सकडून पराभूत झाल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 2019 व 2020 मध्ये एसआरएचला दिल्ली कॅपिटल्सकडून अनुक्रमे एलिमिनेटर व क्वालिफायर 2 मध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. या मोसमासाठी त्यांनी प्रमुख खेळाडूंना कायम ठेवले आहे. मात्र यावर्षी झालेल्या खेळाडूंच्या लिलावावेळी एसआरएच प्रँचायजीने खेळाडू मिळविण्यासाठी जास्त उत्सुकता दाखविली नव्हती. त्यांची लाईनअप स्थिरावली असल्याने बॅकअपसाठी पर्याय म्हणून त्यांनी काही खेळाडूंना या लिलावात खरेदी केले आहे. अननुभवी मध्यफळी ही त्यांची एकमेव कमकुवत बाजू असल्याचे गेल्या आयपीएलवेळी दिसून आले आहे. त्यांना प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद यांच्यावर अवलंबून रहावे लागले होते.
समतोल संघ
समतोल संघ ही सनरायजर्स हैदराबादची बळकट बाजू आहे, विशेषतः त्यांची आघाडी फळी मजबूत आहे. डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, जेसॉन रॉय, केन विल्यम्सन, मनीष पांडे, वृद्धिमान साहा हे या संघांत असल्याने सर्वात घातक ठरू शकणारी फलंदाजी लाईनअप त्यांच्याकडे आहे, असे म्हणता येईल. वॉर्नर-बेअरस्टो ही आयपीएलमधील सर्वात धोकादायक सलामीची जोडी असून प्रतिस्पर्ध्यांची कोणतीही गोलंदाजी पहिल्या चेंडूपासूनच फोडून काढण्यास ते हयगय करीत नाहीत. ही जोडी जमली तर कोणतेही उद्दिष्ट गाठणे त्यांच्या संघाला कठीण जात नाही. सध्या फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंडच्या जेसॉन रॉयचाही विचार होणार असल्याने चार विदेशी खेळाडूंची निवड करणे संघव्यवस्थापनाला अडचणीचे ठरणार आहे. कारण वॉर्नर व रशिद खान यांची निवड निश्चित असते. उर्वरित दोन जागांसाठी परिस्थिती पाहून खेळाडूंची निवड करतील. त्यामुळे अष्टपैलू असलेल्या जेसॉन होल्डर आणि अनुभवी केन विल्यम्सन यांना निवडले जाऊ शकते. तसे झाल्यास चार विदेशींचा कोटा पूर्ण होईल आणि रॉयला संघाबाहेर रहावे लागेल. एसआरएचची गोलंदाजीही प्रभावी दिसते. भुवनेश्वर पूर्ण तंदुरुस्त झाल्याने त्यांची ताकद वाढली असून रशिद खानसह दोघे आक्रमणाचे नेतृत्व करतील. अफगाणचा स्टार मुजीब उर रेहमान व यॉर्कर किंग टी.नटराजन यांच्यामुळे त्यांच्या आक्रमणाला आणखी धार आली आहे.
फिनिशरचा अभाव
फिनिशरची उणीव, हा या संघाचा कमकुवत दुवा आहे. यूएईमध्ये झालेल्या मागील आवृत्तीत त्यांची मध्यफळी अडखळताना दिसली. ही उणीव दूर करण्यासाठी विल्यम्सनच्या अनुभवावर त्यांनी भिस्त ठेवली आहे. विजय शंकर हा अष्टपैलू म्हणून ओळखला जात असला तरी एसआरएचसाठी त्याला अद्याप आपली क्षमता दाखवून देता आलेली नाही. संघव्यवस्थापनासाठी हाच चिंतेचा विषय बनला आहे. यावर्षी त्यांनी केदार जाधवला संघात सामावून घेतले असले तरी प्रॅक्टिसच्या अभावामुळे तो आपली योग्यता दाखवून देण्यात यशस्वी ठरेल का, हे पहावे लागेल.
आघाडी फळीच्या यशावर विसंबून
आघाडी फळीच्या यशावर पूर्णपणे अवलंबून असणे, हे या संघाचे धोकादायक लक्षण आहे. वॉर्नर, बेअरस्टो, पांडे, विल्यम्सन दीर्घ काळ अपयशी ठरत गेले तर मध्य व तळाच्या फळीवर मोठे दडपण येते, त्यात होल्डर, विजय शंकर व इतरांचा समावेश आहे. गोलंदाजीच्या विभागातही हा संघ रशिद खानच्या कामगिरीवर मोठय़ा प्रमाणात अवलंबून राहतो. संघाला गरज असते तेव्हा, त्यानेच यश मिळवून द्यावे, अशी अपेक्षा केली जाणे, हेही त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
सनरायजर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), विल्यम्सन, विराट सिंग, मनीष पांडे, प्रियम गर्ग, साहा, बेअरस्टो, जेसॉन रॉय, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोह. नबी, केदार जाधव, जे.सुचित, होल्डर, अभिषेक शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बसिल थम्पी, शाहबाज नदीम, मुजीब उर रेहमान.