अभिनयाच्या क्षेत्रात यायचं तर बांधेसूद असावं लागतं. म्हणूनच अनेकींनी वजन कमी केलं. सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट आधी चांगल्याच जाड होत्या. मात्र नंतर त्यांनी फिटनेसचा मंत्र जपला. सना खानच्या बाबतीतही असंच घडलं. सना आता लग्न करून स्थिरस्थावर झाली आहे. मात्र या क्षेत्रात येण्यासाठी सनाने आठ किलो वजन कमी केलं होतं. अर्थात आताही तिच्या दिनक्रमात फारसा बदल झालेला नाही. सनाने वजन कसं कमी केलं हे जाणून घेऊ.
मनोरंजनाच्या क्षेत्रात आली तेव्हा सनाचं वजन 60 किलो होतं. वजन कमी करायची इच्छा असूनही ते कमी होत नव्हतं. त्यामुळे आपण काहीतरी चुकीचं करत आहोत याची जाणीव तिला झाली. सना वैयक्तिक प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन घेत होती. तरी तिचं वजन काही केल्या कमी होईना. मग तिने प्रशिक्षक बदलला. रक्त तपासणी करून घेतली. रक्तातल्या चरबीची टक्केवारीही तिने जाणून घेतली. वजन कमी करण्यासाठी हाडांच्या रचनेचं ज्ञान असणं गरजेचं असतं असं ती सांगते. सुरूवातीला जीममध्ये तिला खूप कंटाळा येत असे. मग बदल म्हणून तिने चार ते पाच महिने पिलेट्स केले. त्यानंतर तिला जीमची खूप आठवण यायला लागली. आता सनाला जीम खूप आवडतं. ती वेगवेगळे व्यायाम करते. दिवसातले दोन ते तीन तास ती व्यायामासाठी देते.
सनाने आहाराचं नियोजन केलं आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून सना योग्य आहार घेते आहे. यामुळे तिने 8 किलो वजन कमी केलं आहे. सकाळी उठल्यावर ती दोन ग्लास गरम पाणी पिते. त्यानंतर कॅल्शियम सप्लिमेंट घेते. मग साधारण 20 मिनिटांनी ती खाते. सनाला कॉफी आवडते. पण ती ब्लॅक कॉफी पिते. न्याहारीला ती अंडी, फळं, विविध जीवनसत्त्वं, ‘बी’ कॉम्प्लेक्स गोळ्या आणि फिश ऑईल सप्लिमेंट्स घेते. दुपारी ती जीममध्ये जाते. व्यायाम केल्यानंतर दहा मिनिटांच्या आत ती ‘ई’ आणि ‘क’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेते. पाण्यासोबत ती प्रोटिन पावडर घेते. दुपारच्या जेवणात ती चिकन खाते. त्यासोबत मशरूम, ब्रोकोलीसारख्या भाज्या खाते.
संध्याकाळी घरगुती पॅनकॅन किंवा एखादं फळ खाते. रात्रीच्या जेवणातही चिकन असतं. उकडलेल्या चिकनसोबत मूग सूपही ती घेते. जेवणासाठी ती ऑलिव्ह ऑईलचा वापर करते. दररोज नारळ पाणी पिते. आयुष्यभर तंदुरूस्त राहायचं असेल तर व्यायाम करण्याचा सल्ला ती देते.