युरो स्पर्धेत डेन्मार्कचा एरिक्सन मैदानात कोसळल्यानंतर एकच खळबळ, फिनलंडविरुद्ध लढत स्थगित
कोपनहॅगन / वृत्तसंस्था
डेन्मार्कचा मिडफिल्डर ख्रिस्तियर एरिक्सन युरोपियन चॅम्पियनशिपमधील पहिल्या साखळी सामन्यादरम्यान मैदानावरच कोसळल्याने शनिवारी एकच खळबळ उडाली. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरु झालेल्या या लढतीत पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात एरिक्सन मैदानावर कोसळला आणि अवघे क्रीडा विश्व थबकून गेले. एरिक्सनला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेले जात असताना खेळाडूंनी त्याच्याभोवती केलेली कडी आणि आयोजकांनी काही क्षणातच सामना तहकूब करत असल्याची केलेली घोषणा चिंता वाढवणारी ठरली. मात्र, सुदैवाने एरिक्सनला मैदानावरुन बाहेर नेले जात असताना दिलेले प्रथमोपचार लागू झाले आणि तो सुखरुप असल्याचे आयोजकांनी काही मिनिटानंतर जाहीर केले. ही मधली काही मिनिटे मात्र अवघ्या क्रीडा विश्वासाठी अक्षरशः सन्नाटा पसरवणारी ठरली.
युरो चषक स्पर्धेतील सामने एकूण 11 देशात खेळवले जात असून त्यातील एक साखळी लढत कोपनहॅगन येथे होणे अपेक्षित होते. या लढतीसाठी डेन्मार्क-फिनलंडचे संघ मैदानावर आमनेसामने उभे ठाकले आणि प्रत्यक्ष लढतीला सुरुवात झाली. खेळ पहिल्या सत्रातील उत्तरार्धाकडे झुकत असतानाच अचानक अनहोनी झाली आणि डेन्मार्कचा मिडफिल्डर ख्रिस्तियन एरिक्सन एक शॉर्ट पास दिल्यानंतर कोणाचाही धक्का लागलेला नसताना अचानक मैदानावर कोसळला.
एरवी एखाद्या फुटबॉलपटूने मैदानावर कोसळण्यात नवे काहीच नाही. पण, एरिक्सनचे कोणाचाही धक्का न बसता अचानक मैदानावर कोसळणे चिंतेचे होते आणि तातडीने वैद्यकीय पथकाला पाचारण केले गेले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एरिक्सनला स्ट्रेचरवरुन बाहेर नेले गेले आणि सामना थांबवला गेल्याने स्टेडियममध्ये अक्षरशः स्मशान शांतता पसरली. एरिक्सनला मैदानाबाहेर नेत असताना चेस्ट कॉम्प्रेशन्स दिले जात होते. युफाने नंतर मेडिकल इमर्जन्सीमुळे सामना स्थगित करत असल्याची घोषणा प्रेक्षकांची आणखी घालमेल वाढवणारी ठरली.
त्यानंतर मात्र काही मिनिटांनी डॅनिश फेडरेशनने सर्वांना दिलासा देणारे ट्वीट करत एरिक्सन शुद्धीवर असल्याचे जाहीर केले. रिगोहॉस्पिटलेटमध्ये त्याच्या काही चाचण्या घेतले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. स्थानिक प्रमाणवेळेनुसार, रात्री 7.45 वाजता तातडीची बैठक घेऊन त्यात अधिक माहिती दिली जाईल, असे युफाने उशिराने जारी केलेल्या ट्वीटमध्ये जाहीर केले होते.