सपा आमदारांच्या बैठकीत शिक्कामोर्तब
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली नवे सरकार शपथबद्ध झाल्यानंतर आता समाजवादी पक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहे. समाजवादी पक्षाच्या नव्या आमदारांची बैठक शनिवारी झाली. या बैठकीत अखिलेश यादव यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यावर सर्व नवनिर्वाचित सपा आमदारांनी शिक्कामोर्तब केले.
विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी हा पक्ष प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे. सपाने आपल्या नवीन आमदारांची शनिवारी 11 वाजता बैठक बोलावली होती. या बैठकीत पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याने ते आता विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळणार आहेत. मैनपुरीच्या करहल विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर त्यांनी विधानसभेत भाजप सरकारचा मुकाबला करण्यासाठी प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचे ठरवले आहे.