30 दिवसात 32 हजार 218 रूग्ण पॉझिटिव्ह, 20 हजार 158 रूग्णांची कोरोनावर मात
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱया लाटेत बाधितांचा आकडा वाढत चालला असून काही प्रमाणात मृत्यू रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. दुसऱया लाटेत एप्रिलच्या प्रारंभापासून कोरोना संसर्गाचा ‘पीक’ सुरू असून 30 दिवसांत 32 हजारावर (सरासरी दिवसाला 1 हजारावर) रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र सप्टेंबरमधील ‘पीक’ मध्ये झालेल्या मृत्यूंपेक्षा कमी मृत्यूंची नोंद एप्रिलमध्ये झाली आहे. एप्रिल महिना संपताना शुक्रवारी रेकॉर्डब्रेक 2494 रूग्ण पॉझिटिव्ह आले असून 1851 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 32 मृत्यूंची नोंद झाली आहे. 1 मे पासून 18 वर्षांपासून लसीकरण सुरू होणार असल्याने त्याकडे लक्ष लागले आहे.
13 महिन्यात सर्वाधिक रूग्ण एप्रिलमध्ये
कोरोनाचा पीक गतवर्षी सप्टेंबरमध्ये आला होता. त्यावेळी केंद्रबिंदू कराड होता. त्यावेळी एका महिन्यात 22 हजार 53 इतके रूग्ण पॉझिटिव्ह आले होते. 19680 जणांनी कोरोनावर मात केली होती. 726 रूग्ण दगावले होते. त्यावेळी एकूणच हा आजार नवीन होता. तितक्याशा सुविधा उपलब्ध झाल्या नव्हत्या. बेड, ऑक्सिजन मिळत नव्हते. प्रचंड भीती होती. त्यामुळे मृत्यू वाढले होते.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा पीक एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून सुरू झाला आहे. 1 एप्रिललाच 532 रूग्णांची नोंद झाली होती. तर 30 एप्रिलला 2494 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. 1 ते 30 एप्रिल दरम्यान एकुण 32 हजार 218 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर या महिन्यात 20 हजार 158 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 586 मृत्यूंची नोंद झाली आहे. सप्टेंबरमध्ये 726 जणांचा मृत्यू झाला होता. 1 एप्रिलला उपचारात असणारे रूग्ण 3936 होते. ते 30 एप्रिलला 14123 ने वाढून 18059 झाले आहेत.
मे महिन्याचे दोन आठवडे महत्वाचे
कोरोनाचा पीक सुरू असला तरी मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱया आठवडय़ात कोरोना संसर्ग उतरणीला लागेल, अशी शक्यता राज्याच्या कोविड टास्क फोर्सच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे. सद्यस्थितीतील हाहाकार पाहता संसर्गाचे प्रमाण कमी व्हावे, अशी प्रार्थना जिल्हावासिय करत आहेत.
शुक्रवारी रेकॉर्डब्रेक 2494
जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2493 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात सर्वाधिक 466 रूग्ण साताऱयात नोंद झाले आहेत. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे-जावली 128 (4824), कराड 212 (15714), खंडाळा 144 (6315), खटाव 309 (8906), कोरेगाव 251 (8680), माण 185 (6136), महाबळेश्वर 35 (3339), पाटण 124 (4229), फलटण 389 (13059), सातारा 466 (23617), वाई 221 (7889 ) व इतर 29 (573) असे आजअखेर एकूण 103281 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
32 मृत्यूंची नोंद
गेल्या चोवीस तासात 32 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे- जावली 1 (103), कराड 4 (432), खंडाळा 0 (82), खटाव 5 (253), कोरेगाव 2 (233), माण 5 (141), महाबळेश्वर 1 (31), पाटण 1 (118), फलटण 3 (184), सातारा 7 (733), वाई 3 (186) , व इतर 0, असे आजअखेर जिह्यामध्ये एकूण 2496 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
1851 नागरिकांना डिस्चार्ज
गेल्या चोवीस तासात जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 1851 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्हय़ात 15 मेपर्यंत निर्बंध वाढले
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्हय़ात 15 मे पर्यंत निर्बंध कायम ठेवण्याबाबत प्रभारी जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी नवे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे त्यामुळे गेले महिनाभर असलेले निर्बंध आणखी 15 दिवस कायम राहणार आहेत.
18 ते 44 वयोगटाचे लसीकरण 5 ठिकाणी सुरू होणार
जिह्यात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोविड-19 चे प्रायोगिक तत्वावर प्रथम 5 ठिकाणी लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये सामान्य रुग्णालय सातारा, उपजिल्हा रुग्णालय कराड, ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ व प्राथमिक आरोग्य केंद्र खटाव या ठिकाणी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती, डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.
लस उपलब्ध होताच इतर ठिकाणी केंद्र सुरु
18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी केंद्र शासनाच्या कोविन या ऍपवर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन नोंदणी करुन तारीख व वेळ घेतलेल्या नागरिकांना मिळालेल्या दिनांक व वेळेलाच लसीकरण करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत वॉकइन किंवा ऑन द स्पॉट नोंदणी व लसीकरण करण्यात येणार नाही. लस उपलब्ध होताच जिह्यातील इतर केंद्र सुरु करण्यात येतील, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
ऍक्टीमेरा इंजेक्शनबाबत जिल्हाधिकाऱयांनी केले आदेश जारी
जिह्यात ऍक्टीमेरा इंजेक्शनची टंचाई भासत आहे. त्यामुळे भविष्यातील दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येनुसार इंजेक्शनची मागणी विचारात घेता प्र. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी पुढील आदेश जारी केले आहेत. जिह्यातील कोविड हॉस्पिटल संलग्नग्न मेडिकल व डिस्ट्रीब्युटर्स यांच्याकडे प्राप्त होणाऱया ऍक्टीमेरा इंजेक्शनची विक्री व वितरण जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांच्या लेखी परवानगीखेरीज करण्यात येऊ नये. जिल्हा शल्यचिकित्सकांनी सदरचे इंजेक्शन हे कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खाजगी रुग्णालयास इंजेक्शनचे शुल्क आकारणी व क्लिनिकल गाईडलाईन्सच्या अनुषंगाने शासनाने निर्धारित करुन दिलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन वितरीत केले जाईल. याचा भंग केल्यास संबंधितास दिलेला हॉस्पिटल व मेडिकल लायसेन्स, परवाना रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.