दुसऱया-तिसऱया टप्प्यातील चाचण्या अंतिम टप्प्यात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात लवकरच लहान मुलांचे लसीकरण सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. सप्टेंबर महिन्यात किंवा त्यानंतर लगेच लहान मुलांचे लसीकरण सुरु होणार असल्याचे नुकतेच आयसीएमआर-एनआयव्हीच्या संचालकांनी जाहीर केले आहे. “लहान मुलांवरील दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील लसीच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून चाचण्यांचे परिणाम लवकरच जाहीर होतील. त्यानंतर चाचण्यांचा डाटा ‘डीसीजीआय’कडे पाठवण्यात येईल’’ अशी माहिती आयसीएमआर-एनआयव्हीच्या संचालिका प्रिया अब्राहम यांनी दिली आहे.
12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन व्यतिरिक्त झायडस कॅडिला लसीच्या चाचण्या चालू आहेत. झायडस कॅडिला लस ही वापरासाठी उपलब्ध असलेली पहिली डीएनए लस असेल. याशिवाय, जेनोआ बायोफार्मास्युटिकल्स लि.चे एम-आरएनए, बायोलॉजिकल-ई लस, सीरम इन्स्टिटय़ूटची नोव्होवॅक्स आणि भारत बायोटेकची इंट्रानॅसल लस देखील चाचणीच्या टप्प्यात आहे.
भारतातही कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लसीचा तिसरा बूस्टर डोस घ्यावा लागू शकतो. काही देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस दिला जातोय. भारतातही अशा शिफारसी येत असल्यामुळे भविष्यात बुस्टर डोसची गरज भासू शकते’’ असे प्रिया अब्राहम यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी सीरमचे संचालक सायरस पुनावाला यांनीही बुस्टर डोसची गरज असल्याचे म्हटले होते.