राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनाही भेटणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अमेरिकेचा दौरा करणार आहेत. या दौऱयात ते अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचेही सांगितले जात आहे. बायडेन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. अर्थातच अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर होणाऱया या दौऱयात मोदी आणि बायडेन पहिल्यांदाच समोरासमोर भेटतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अमेरिका दौऱयात वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्कला भेट देतील. पंतप्रधानांचा कार्यक्रम सध्या निश्चित केला जात असला तरी त्याची अद्याप अंतिम घोषणा झालेली नाही. पंतप्रधान मोदी सर्वसाधारणपणे 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान अमेरिकेसाठी रवाना होऊ शकतात, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.