प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहर हे पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्हय़ात मोठा हॉटस्पॉट ठरले होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात सातारा शहर व परिसराला दिलासा लाभला असून 20 सप्टेंबरपर्यंत शहर परिसरात 839 रुग्ण बाधित आले. त्यापैकी 265 रुग्ण सक्रीय असून प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये 40 रुग्ण उपचारार्थ आहेत. तर 123 होम आयसोलेट असून केअर सेंटरमध्ये 18 आयसोलेट आहेत. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान सातारा शहरात एकूण 36 हजार 386 एवढे रुग्ण बाधित झाले होते.
हॉटस्पॉट ठरलेल्या सातारा शहरासाठी सप्टेंबर महिना मोठा दिलासादायक ठरला असून बाधित वाढीचा वेग मंदावला आहे. दोन अंकी संख्येने बाधित समोर येत असले तरी गेल्या काही महिन्यांपेक्षा ही स्थिती कोरोनाची स्थिती आटोक्यात येत असल्याचा संदेश देत आहे. जानेवारी ते ऑगस्ट कालावधीत 383 जणांचा मृत्यू झाला असून सातारा शहराचा मृत्यूदर या कालावधीत 1.36 टक्के एवढा राहिला होता. सगळय़ात जास्त मृत्यू मे महिन्यात 134 नोंद आहेत.
सातारा शहरात जानेवारी 466, फेब्रुवारीत 518, मार्चमध्ये 1,478, एप्रिल महिन्यात 8,035, मे महिन्यात 11,841, जूनमध्ये 4,948 तर ऑगस्टमध्ये 2,509 अशी कोरोना बाधितांची संख्या होती. ऑगस्टपासून वेग मंदावू लागला आणि सप्टेंबर महिन्यात तो बाधित वाढीचा आलेख खाली घसरल्याने 22 सप्टेंबरपर्यंत 839 नवीन बाधित समोर आले आहेत. त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला. मात्र, बाधित वाढ व मृत्यूदराचा आलेख खाली आल्याने सातारा शहर आता चांगलेच सावरु लागले आहे.