मुलायम यांना मौलानांची पदवी…त्यांचा मोदींना आशीर्वाद
काँग्रेसचे महासचिव नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी सप, बसप आणि भाजपवर प्रखर टीका केली आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांना मुस्लिमांनी मौलानाचा दर्जा दिला, परंतु मुलायम यांनी भाजपशी मैत्री करून मोदींना पंतप्रधान होण्याचा आशीर्वाद दिला. समाजवादी पक्षाच्या सरकारने विणकरांचा विश्वास तोडला होता. सत्तेवर आल्यास राज्यात विणकरांचा मीटर फोडून नद्यांमध्ये फेकणार असल्याचे आश्वासन सपने दिले होते. परंतु सपचे सरकार आल्यावर विणकारांच्या पॉवरलूममधील मीटर फेकण्यात आले नाही, उलट विणकरांवर नदीत उडी घेण्याची वेळ आल्याचे सिद्दीकी म्हणाले.
बसप प्रमुख मायावती यांना माझ्याहून अधिक चांगला कुणीच ओळखत नाही. मायावती या केवळ पैशांच्या भुकेल्या आहेत. त्यांना देश तसेच जनतेशी कुठलेच देणेघेणे नाही. भाजपचे सर्वच नेते खोटं बोलत असतात. भाजपचा एक आमदार महिलेची हत्या घडवून आणत आहे, तर दुसरा मंत्रीपुत्र शेतकऱयांना गाडीने चिरडत आहे. दोन्ही पीडित कुटुंबांना काँग्रेसने कोटय़वधी रुपयांची आर्थिक मदत पुरविली आहे. काँग्रेसने प्रत्येक घटकाचा आणि क्षेत्रात विकास करून दाखविला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.