सफाई मजदूर काँग्रेसचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
सफाई मजदूर कामगारांना अधिकृत असे सरकारी व्यासपीठ आहे. मात्र हे व्यासपीठ अनुसूचित जाती आयोगाकडे वर्गीकरण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे वाल्मिकी समाज तथा लाखो सफाई मजदूर कामगारांवर अन्याय होणार असून राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकाळ वाढवावा, कोणत्याही प्रकारे त्याचे इतर आयोगामध्ये वर्गीकरण करू नये, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली आहे.
सफाई मजदूर काँग्रेस एक स्वतंत्र ट्रेड युनियन आहे. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगावर विविध राज्यातील संघटना प्रतिनिधीत्व करत आल्या आहेत. यापुढेही त्यांची नियुक्ती करून प्रतिनिधीत्व करण्यास द्यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. सफाई मजदूर आयोग हे स्वतंत्र असल्यामुळे त्या कर्मचाऱयांना थेट योजनांचा लाभ मिळू शकतो. हे आयोग जर अनुसूचित जातीमध्ये वर्ग केल्यास त्याचा फटका बसू शकतो. तेव्हा तातडीने स्वतंत्रपणे हा आयोग ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी काशिराम चव्हाण, मुनाली चव्हाण, मनोहर शिंदोळकर, पी. एल. रजपूत, पंकज चव्हाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते.