बॅचलर ऑफ आर्किटेक्टरमध्ये शिवाजी विद्यापीठात ‘नंबर वन’ : डी. वाय. पाटील कॉलेजच्या कन्येची गोल्डन कामगिरी
प्रतिनिधी/कोल्हापूर
कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या सबा रियाज लाड हिने बॅचलर ऑफ आर्किटेक्चरमध्ये (बी-आर्च) विक्रमी गुणांसह सुवर्णपदक संपादन केले. सबाने नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षेच्या निकालात 1300 पैकी 1217 विक्रमी गुण मिळवून (93.61 टक्के) अव्वल क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या बी-आर्च परीक्षेच्या आजवरच्या इतिहासात असे विक्रमी गुण मिळविणारी सबा पहिली विद्यार्थी आणि विद्यार्थिंनीही ठरली आहे.
सबाने होलीक्रॉस कॉन्व्हेट स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर कदमवाडीतील डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजमधून अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये बी-आर्चच्या पदवीसाठी प्रवेश घेतला. पाच वर्षे तिने कसून अभ्यास करत यश संपादन केले. पाच पैकी चार वर्षातील परीक्षेत सबा पहिल्या पाचमध्ये क्रमांकांत होती. मात्र अंतिम वर्षाच्या परीक्षेत तिने सर्वांना मागे टाकत विक्रमी गुण संपादन केले. तिला प्रा. रवींद्र सावंत, प्रा. इंद्रजित जाधव, प्रा. मधुगंधा मिठारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे शेवटच्या वर्षीची परीक्षा देताना सबा अनुभवासाठी नोकरीही करत होती. सध्याही ती सिथेंसिस डिझाईन्स नामक कंपनीत नोकरी करत असून मास्टर ऑफ आर्किटेक्चर (एम-आर्च) या पदव्युत्तर शिक्षणासाठीही तिने प्रवेश घेतला आहे.
सबाचे वडील रियाज लाड हे कोल्हापुरातील नामांकित सिव्हिल इंजिनिअर आहेत. आई अमिना लाड या ताराबाई पार्कमधील ब्लुमिंग बर्ड्स शाळेत शिक्षका आहेत. एकुलती एक असणाऱ्या सबाला लाड दाम्पत्याने प्रोत्साहन देत शिकविले आहे. सबानेही आपल्या आई-वडिलांचे स्वफ्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल केली आहे. मोठी आर्किटेक्ट होण्याबरोबर या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण काम करत वेगळेपण जपण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया सबाने दिली. कोल्हापुरातील नामांकित अस्थिरोगतज्ञ डॉ. सलीम लाड यांची सबा पुतणी असून प्रसिद्ध क्रिकेटपटू, शाईन इलेक्ट्रो फ्लेटिंगचे मालक बाबजी सनदी यांची भाची आहे.
असा विक्रम
बी-आर्चच्या पदवी परीक्षेत शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात आजवर अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांनी 89 टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. पण सबा लाडने 93.61 टक्के गुण मिळवित विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदक मिळवले.
बी-आर्चमधील टॉप फाईव्ह
शिवाजी विद्यापीठाने बॅचलर ऑफ आर्किटेक्चर परीक्षेचा (2021) निकाल जाहीर केला. त्यातील टॉप फाईव्ह विद्यार्थी असे : 1) सबा रियाज लाड, गुण 1217/1300, 2) पृथ्वीराज प्रमोदसिंह मोरे 1180 / 1300, 3) रितल राजन पंडीत, 1174 /1300, 4) देविका मदन घाटगे, 1169/1300 या विद्यार्थ्यांचे कॉलेज : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर, 5) केतकी विपुल वणकुद्रे, 1168/1300, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, शिवाजी पेठ, कोल्हापूर.