कणकवलीत खासदार राऊत यांचा पुतळा दहनप्रकरण
कणकवली:
खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन केल्याप्रकरणी भाजपच्या 19 जणांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडला होता. काही वक्तव्यांवरून राणे-शिवसेना वाद सुरू असून त्याचे पडसाद कणकवलीत उमटू नयेत, यासाठी येथे पोलीस बंदोबस्त आहे. मात्र, पोलिसांनाही चकवा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी येथील नारायण राणे संपर्क कार्यालयासमोर राऊत यांच्या पुतळय़ाचे दहन केले होते.
याबाबत रात्री उशिरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद पोलीस नाईक कैलास इंफाळ यांनी दिली आहे. त्यानुसार पं. स. सभापती मनोज रावराणे, भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्राr, संतोष कानडे, तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, भाजप प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत, नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक शिशीर परुळेकर, महिला तालुकाध्यक्षा हर्षदा वाळके, पं. स. सदस्या सुजाता हळदिवे, भाजप महिला शहराध्यक्षा प्राची कर्पे, रमेश पावसकर, राजन चिके, सदा चव्हाण, युवा मोर्चाचे संदीप मेस्त्राr, पपू पुजारे, सुभाष मालंडकर, संजना सदडेकर, नितीन पाडावे अशा 19 जणांविरोधात मनाई आदेशाचे उल्लंघन व बेकायदेशीररित्या जमाव करून पुतळय़ाचे दहन केल्याप्रकरणी भादंवि कलम 143, 149, 285, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार ममता जाधव करत आहेत.